मुंबई - ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांनंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु, आज पुन्हा रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ पाहायला मिळाली. मुंबईत आज नव्या 1 हजार 069 रुग्णांची नोंद झाली असून 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीस दिवसांत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 243 दिवस वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
12 हजार 674 सक्रिय रुग्ण
मुंबईत आज (बुधवारी) कोरोनाचे 1 हजार 069 नवे रुग्ण आढळून आले असून 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 18 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 17 पुरुष तर 5 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 66 हजार 746 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 506 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 714 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 39 हजार 800 वर गेला आहे. सध्या मुंबईत 12 हजार 674 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 243 दिवसांवर
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 233 दिवस तर सरासरी दर 0.29 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 500 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 934 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 16 लाख 48 हजार 347 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या आधी कमी नोंद झालेली रुग्णसंख्या
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण