मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या व त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटली आहे. गेल्या पावणे दोन वर्षात आज पाचव्यांदा तर डिसेंबर महिन्यात चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली असून आज कोरोनाचे 204 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
पाचव्यांदा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद होत होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली होती. आज 20 डिसेंबरला पाचव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.
आज 204 नवे रुग्ण -
आज 20 डिसेंबरला 204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 67 हजार 331 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 46 हजार 328 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2061 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2095 दिवस इतका आहे. मुंबईमधील 17 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 13 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे.
..या दिवशी रुग्णसंख्या 200 च्या वर -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 20 डिसेंबरला 204 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.