मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या ( Corona Mumbai ) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज ( रविवारी ) सलग पाचव्या दिवशी २ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज २०८७ रुग्णांची नोंद ( 2087 Corona patients ) झाली असून १ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६५२ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ९१ रुग्ण ऑक्सिजनवर, १३१ रुग्ण आयसीयूमध्ये तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
१३.८८ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह :मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १५ हजार ०२६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २०८७ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १३.८८ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. १८०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ९४ हजार ६४४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ६१ हजार १६४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३ हजार ८९७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३८१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१७८ टक्के इतका आहे.
१४ रुग्ण व्हेंटिलेटरवर :मुंबईत आज आढळून आलेल्या २०८७ रुग्णांपैकी १९५० म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८२३ बेड्स असून त्यापैकी ६५२ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ९१ रुग्ण ऑक्सिजनवर, १३१ रुग्ण आयसीयूमध्ये तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.