महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरिएंट’चे ५४ टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे ३४ टक्के रुग्ण - कोरोना डेल्टा डेरिव्हेटीव्ह

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये करण्यात आलेल्या तिसऱ्या चाचणीचे अहवाल आले आहेत. त्यानुसार ३४३ पैकी १८५ म्हणजेच ५४ टक्के रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिएंट’ तर ११७ म्हणजेच ३४ टक्के रुग्ण हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mumbai corona
Mumbai corona

By

Published : Oct 17, 2021, 9:57 PM IST

मुंबई - कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वेळीच चाचण्या होणे महत्वाच्या आहेत. त्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेसिंग चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे केलेल्या तिसऱ्या चाचणीत एकूण ३४३ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात ‘डेल्टा व्हेरिएंट’चे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविड लसीकरणाचा प्रभाव चांगला झाल्याने साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

३४३ पैकी १८५ रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे -

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये करण्यात आलेल्या तिसऱ्या चाचणीचे अहवाल आले आहेत. त्यानुसार ३४३ पैकी १८५ म्हणजेच ५४ टक्के रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिएंट’ तर ११७ म्हणजेच ३४ टक्के रुग्ण हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये इतर प्रकारांचे ४० बाधित रुग्ण (१२ टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे. डेल्टा व्हेरिएंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिएंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण- प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

लस घेतलेल्यांचा मृत्यू नाही -

कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास पहिला डोस घेतलेल्या ५४ नागरिकांना कोविड बाधा झाली मात्र फक्त ७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. ५४ पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दोन्ही डोस घेतलेल्या १६८ नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त ४६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही अवघ्या ७ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब दिलासा देणारी आहे.

हे ही वाचा -पवार कुटुंबीयांवर आरोप करणारे मोठे होत असतात.. सुप्रिया सुळेंचा किरीट सोमैयांना टोला

लस न घेतलेल्या १२१ नागरिकांना बाधा -

लसीचा एकही डोस न घेतलेल्या १२१ नागरिकांना बाधा झाली. त्यातील ५७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाबग्रस्त होते. यातील दोघांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ तर एकास ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झालेली होती. मात्र, या तिन्ही रुग्णांनी कोविड बाधा निष्पन्न होवूनही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्याने त्यांच्या जीवावर बेतले, अशी माहिती प्रशासनाने दिली.

मुलांमध्ये कोविड नियंत्रणात -

१८ पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण ३४३ रुग्णांपैकी २९ जण (८ टक्के) या वयोगटात मोडतात. पैकी ११ जणांना ‘डेल्टा व्हेरिएंट’, १५ जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ आणि ३ जणांना इतर प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

हे ही वाचा -Health Department Exam : परीक्षार्थींसाठी जिल्ह्यातच परीक्षा केंद्र.. आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण



२१ ते ४० वयोगटात रुग्ण अधिक -

कोविड बाधा झालेल्या एकूण ३४३ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. नमुने घेतलेल्या बाधित ३४३ रुग्णांपैकी ४५ रुग्ण (१३ टक्के) रुग्ण हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात १२६ रुग्ण (३७ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ९८ रूग्ण (२९ टक्के) ६१ ते ८० वयोगटात ६३ रुग्ण (१८ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ११ रुग्ण (३ टक्के) या चाचणीमध्ये समाविष्ट आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details