महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राणे यांची केंद्रात लागणार कसोटी - भाई जगताप - bhai jagtap on narayan rane

कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महाराष्ट्रातील छोट्या - मोठ्या उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी मंत्री राणे यांची कसोटी लागेल, असे मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केले.

bhai jagtap
भाई जगताप

By

Published : Jul 9, 2021, 8:13 PM IST

मुंबई -आक्रमक, सडेतोड भूमिका घेणाऱ्या नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून महाराष्ट्रातील छोट्या - मोठ्या उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी मंत्री राणे यांची कसोटी लागेल, असे मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.

  • उद्योग क्षेत्राला उभारी -

नारायण राणे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री बनवले होते. महाराष्ट्रातील राजकीय कारकिर्दीत त्यांचा अनोखा लौकिक आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात राज्याचे नेतृत्व म्हणून त्यांना संधी मिळत आहे. राज्यासह माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आज केंद्रामध्ये होणार असून सूक्ष्म व उद्योग हे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे असेल. कोविडच्या महामारीत राज्यातील उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला आहे. केंद्राकडून उद्योग क्षेत्राला सहकार्य मिळाल्यास राज्यातील उद्योग क्षेत्राला उभारी मिळेल. एकेकाळी धडाडी, आक्रमकता आणि सडेतोड भूमिका घेणाऱ्या कोकणातील नेते आणि केंद्रातील मंत्री म्हणून राणेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर कसोटी लागणार आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्याला मंत्री राणे कशापद्धतीने मदत मिळवून देतात, हे पाहावे औत्सुक्याचे ठरेल, असे भाई जगताप म्हणाले.

  • आक्रमक मंत्री राणे भाजपमध्ये जम बसवणार का?

नारायण राणेंनी एकेकाळी राज्याचे राजकारण आपल्याभोवती केंद्रित केले होते. आपल्या राजकीय कारकीर्दीचा मुंबईत प्रारंभ करून १९९० च्या दशकात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बस्तान बसवले. केवळ सिंधुदुर्ग नव्हे, तर रत्नागिरीसह कोकणचे नेते असल्याचे स्वत:ला सिद्ध केले. २००५ मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राणेंच्या प्रभावाची चर्चा राज्यभरात झाली. मात्र, आज ना उद्या काँग्रेस मुख्यमंत्रीपद देईल, अशी राणेंची अपेक्षा होती आणि त्यांनी ती बोलूनही दाखवली. मात्र, काँग्रेसमध्ये महसूलमंत्री आणि उद्योगमंत्री या खात्यांपलीकडे राणेंना काही मिळाले नाही. काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांशी त्यांनी उघडपणे पंगा घेतला होता. २०१४ च्या विधानसभा आणि वांद्रे येथील पोटनिवडणुकीत राणेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाच्या अधोगतीला सुरुवात झाली. आता मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भाजपमध्ये ते आता कसा जम बसवतात हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा -राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

ABOUT THE AUTHOR

...view details