महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गरिबांच्या आवाजासाठी बैलगाडीचे असे अनेक अपघात सहन करू - भाई जगताप

आमचे हे आंदोलन गरिबांची लढाई आहे. गरिबांचा या केंद्र सरकारविरोधात रोष आहे. या लढाई दरम्यान कितीही अडचणी आल्या. कितीही अपघात झाले तरी ते आम्हाला चालेल, पण गरिबांचा हा लढा लढत राहणार व गरिबांचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम करत राहणार, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.

mumbai congress agitation on fuel hike
mumbai congress agitation on fuel hike

By

Published : Jul 11, 2021, 8:58 PM IST

Updated : Jul 11, 2021, 9:12 PM IST

मुंबई - केंद्रातील भाजप सरकार व भाजपचे नेते हे गरिबांच्या समस्यांबद्दल, त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल काहीही बोलत नाहीत. कधीही त्यांच्या हिताची भूमिका मांडत नाहीत. अदानी व अंबानी या आपल्या दोन श्रीमंत मित्रांना सांभाळणं व त्यांच्याकडे लक्ष पुरविणे हेच काम मोदी सरकार आजपर्यंत करत आलेली आहे. पण आमचे हे आंदोलन गरिबांची लढाई आहे. गरिबांचा या केंद्र सरकारविरोधात रोष आहे. या लढाई दरम्यान कितीही अडचणी आल्या. कितीही अपघात झाले तरी ते आम्हाला चालेल, पण गरिबांचा हा लढा लढत राहणार व गरिबांचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम करत राहणार, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.


सायकल रॅलीचे आयोजन -


आज भर पावसामध्ये उत्तर मुंबई काँग्रेसतर्फे मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीविरोधात आज उत्तर मुंबईतील बोरिवली पश्चिम स्थानकाबाहेरून काँग्रेसतर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली बोरिवलीपासून मालाडपर्यंत आयोजित करण्यात आली होती.

इंधन दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसची सायकल रॅली

यावेळी मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाई जगताप म्हणाले, की काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल चे दर 70 रुपये पोहचण्यासाठी 70 वर्षे गेले, परंतु नरेंद्र मोदीच्या काळामध्ये सात वर्षांमध्ये पेट्रोल १०७ रुपयांवर पोहोचले आहे. यावर नरेंद्र मोदींजवळ काय उत्तर आहे.

मोदी सरकारने पेट्रोलवर जो ३२ रुपये अबकारी कर मागील ७ वर्षांमध्ये वाढवला आहे. तो २० रुपयांनी जरी कमी केला असता, तरी जनतेला थोडासा दिलासा मिळाला असता. पण गरिबाला दिलासा देण्याची भूमिका ही नरेंद्र मोदी व भाजप सरकारची बिलकुल नाही. मोदी सरकार फक्त आपल्या व आपल्या २ उद्योगपती मित्रांसाठी जनतेची लूट करत आहे, अशी परखड टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईत केली. पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस दरवाढी विरोधात आणि वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने ७ जुलै २०२१ पासून संपूर्ण मुंबईभर निषेध आंदोलन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर मुंबई युवक काँग्रेस तर्फे आज मुंबईमध्ये इंद्रप्रस्थ मॉल, बोरिवली पश्चिम ते एन एल कॉलेज मालाड पश्चिम 'भव्य सायकल रॅली' चे आंदोलन करण्यात आले होते. या रॅली दरम्यान भाई जगताप बोलत होते.

मुंबईत आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व नेते जमिनीवर कोसळले -

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीचा प्रश्न काँग्रेसने लावून धरला आहे. या दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन केले जात आहे. काँग्रेसने १० जुलै रोजी मुंबईतही अशाच प्रकराच्या जनआंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनादरम्यान एक विचित्र घटना घडली. या आंदोलनामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आणलेली बैलगाडी अचानकपणे तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले. यावर भाजपकडून भाई जगताप व राहुल गांधींची टिंगल केली गेली. याला उत्तर देताना भाई जगताप म्हणाले, की असे कितीही अपघात झाले तरी गरीबांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी पुढेही आंदोलने करत राहु.

Last Updated : Jul 11, 2021, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details