मुंबई -कोरोना काळात देशातील जनतेच्या जीवाशी पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक खेळ केला. लोकांचा तडफडून जीव गेला. प्रेतांची विटंबना करण्यात आली. हे पाप गंगेने दाखवून दिले. त्यामुळे भाजपाने कितीही जनआशीर्वाद यात्रा काढावी, लोकांचा त्यांना तळतळाट मिळणार, असा घणाघात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे.
'जनआशीर्वाद यात्रेला तळतळाट मिळणार'
राज्यात केंद्रीय मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष जगताप यांनी या यात्रेवर सडकून टीका केली. कोरोनामध्ये लोकांचे प्रचंड हाल झाले. लसीकरण करु शकत नाही. लोकांच्या नातेवाईकांना न्याय देऊ शकले नाहीत. प्रेत चोरून चोरुन गंगेत टाकले. ते पाप गंगेने दाखवून दिले. मागील सात वर्षांतील जुमेलबाजी, आत्मनिर्भर भारत, काळी कर्तृत्व, काळी राजवट देशातील जनतेला माहीत झाली आहेत. आता जनआशिर्वाद यात्रा काढत आहेत. मात्र लोकांचा तडफडत मृत्यू झाला आहे, त्यांना आशिर्वाद कसे देतील. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. जनतेच्या जिवाशी खेळण्याचे पाप भाजपाने जाणीवपूर्वक केले, असे भाई जगताप म्हणाले. देशाचे पंतप्रधान त्यावर ब्र काढत नाहीत. दुसऱ्या लाटेचा प्रचंड फटका बसला. आता तिसरी लाट समोर असताना, लस गोंधळ कायम आहे. देशातील जनता वैतागले आहेत. छोटे व्यापारी मोदी सरकारने संपवले आहेत. व्यापारी वर्ग संतप्त झाला असून मोदी सरकार जाऊ दे, अशी मागणी जोर धरू लागल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. भाजपाने काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेला तळतळाट मिळणार असल्याचेही जगताप म्हणाले. मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेलाही महत्त्व देत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.