मुंबई -मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या द ललित या हॉटेलमध्ये नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र त्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. याची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या हॉटेलमध्ये जाऊन पाहाणी केली. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, या हॉटेलमध्ये 23 तारखेपासून दिवसाला 500 जणांना लस दिली जात असल्याचे समोर आले आहे. सुश्रुत आणि क्रीटीकेअर या दोन रुग्णालयांनी या हॉटेलसोबत करार केला आहे. या रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी केंद्राकडून मिळाली आहे. मात्र याची माहिती महापालिकेला नसल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे, लसीकरणासाठी जे नियम असतात त्याचे पालन इथे झाले नसल्याचे महापौरांनी म्हटले आहे. या लसी साध्या फ्रीजमध्ये साठवून ठेवण्यात आल्या आहेत, यावर देखील महापौरांनी अक्षेप घेतला आहे. या प्रकरणाशी हॉटेलचा फारसा संबंध नाही, रुग्णालयांनी हॉटेलसोबत करार केला आहे. या दोनही रुग्णालयांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर पुढील निर्णय घेऊ, असेही यावेळी महापौरांनी म्हटले आहे.