मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यामध्ये मुंबई महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल यावर्षी ५३.१४ टक्के लागल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी ममता राव यांनी दिली. पालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेली आकडेवारी पाहता मागील वर्षांपेक्षा महापालिका शाळांचा निकाल यावर्षी २० टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे.
यंदा मुंबई महापालिकेच्या ४९ अनुदानित व १६१ विनाअनुदानित अशा एकूण २१० माध्यमिक शाळांमधून १३ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ७ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांमध्ये ११ जणांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. मुलुंडच्या गुरू गोविंदसिंह पालिका शाळेतील राम महेंद्रप्रसाद कैसवार याने ९३.२० टक्के गुण मिळवून मुंबई महापालिका शाळांमधून पहिला क्रमांक मिळवला आहे. एन. एम. जोशी मार्ग पालिका शाळेतील पूजा कनोजीया या विद्यार्थीनीने ९२.६० टक्के मिळवून दुसरा, तर प्रभादेवी येथील ग्लोब मिल पॅसेज शाळेतील मल्लिका अरुतला हिने ९२.४० टक्के मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. पालिकेच्या तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती राव यांनी दिली.