महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढांवर खंडणीचा गुन्हा दाखल - मंगलप्रभात लोढा लेटेस्ट न्यूज

मंगलप्रभात लोढा
मंगलप्रभात लोढा

By

Published : Mar 12, 2021, 8:57 PM IST

Updated : Mar 12, 2021, 10:13 PM IST

20:29 March 12

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढांवर खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई -भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आणि मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांच्यासह चार जणांवर खंडणी आणि फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. 

मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा, ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचे सुरेंद्रन नायर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भादवि कलम 384, 385, 406, 420, 120 (ब) 34 या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 54 वर्षीय महिला वकिलाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादीने लोढा पार्कमध्ये केला होता फ्लॅट बुक

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या पुण्यात राहतात. त्यांना मुंबईत फ्लॅट घ्यायचा होता. त्यानंतर मित्रांच्या चौकशीतून त्यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या वरळीतील लोढा पार्क या इमारतीत फ्लॅट बुक केला होता. मंगल प्रभात लोढा हे ज्वाला रिअल इस्टेट लिमिटेड कंपनी (नंतर नाव मायक्रोटेक डेव्हलपर्स झाले) या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. तर आता अभिषेक लोढा हे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. दरम्यान फिर्यादी यांनी लोढा पार्क या इमारतीमध्ये फ्लॅट बुक करण्याचे निश्चित केले. त्यानंतर कंपनीचा माणूस सुरेंद्र नायर हा फिर्यादीच्या पुण्यातील घरी आला, व त्याने फिर्यादी यांना या फ्लॅटची संपूर्ण माहिती दिली.

5 कोटी 59 लाख 27,127 रुपयात फ्लॅटचा सौदा 

दरम्यान त्यानंतर 5 कोटी 59 लाख 27,127 रुपयात या फ्लॅटचा सौदा ठरला. यातील 3 कोटी 92 लाख रुपये फिर्यादीने वेळोवेळी दिले होते. परंतु 2013 पासून ते आजपर्यंत फिर्यादी यांना फ्लॅटचे पजेशन मिळाले नाही. याशिवाय फिर्यादी यांना वेळोवेळी त्याची रक्कम वाढवून सांगत आणखी 4 कोटी 15 लाख 15 हजार 386 रुपये भरा अन्यथा तुमचे अग्रीमेंट टू सेल रद्द करण्यात येईल असे सांगितले. तुमची भरलेली रक्कम फॉरफिचरद्वारे जप्त होईल अशी धमकीही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाढीव रक्कम भरण्यासाठी आरोपींनी बळजबरी केली असून, फसवणूक करून खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच वरळीतील लोढा पार्क या इमारतीतील 3901 विंग A हा फ्लॅट हडप केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर चतु:शृंगी पोलिसांनी याप्रकरणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांवर हा गुन्हा दाखल केला आहे. मंगलप्रभात लोढा हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष असून मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर अशाप्रकारे खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. चतु:शृंगी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

Last Updated : Mar 12, 2021, 10:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details