मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात लॉकडाऊन केले आहे. सर्वत्र जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनही बंद करण्यात आली आहेत. अशावेळी मुंबईची दुसरी लाईफलाईन असणारी बेस्ट बससेवा आता अत्यावश्यक सेवा करणाऱ्या लोकांसाठी धावून आली आहे. आज (सोमवार) दिवसभरात सुमारे दोन हजार बससोडून बेस्टने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय, पालिका, आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच मुंबईकरांना दिलासा दिला आहे.
मुंबईची दुसरी लाईफलाईन असणारी बेस्ट आता अत्यावश्यक सेवा करणाऱ्या लोकांसाठी धावून आली आहे... हेही वाचा...COVID19: 'सरकारने योग्य पावले उचललीत...' राज ठाकरेंकडून सरकारचे कौतुक
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात या विषाणूचे ८९ तर मुंबईत ५० रुग्ण आढळले आहे. परदेशातून येणाऱ्या हजारो प्रवाशांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही क्वारंटाईन केलेले प्रवासी नागरिकांमध्ये खुलेआम फिरत आहेत, अशा प्रवाशांमध्ये प्रवासानंतर १४ दिवसात कधीही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई सध्या असलेल्या रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पुढच्या काळात विषाणूचे हजारो किंवा लाखो नागरिक शिकार होऊ नये म्हणून जमावबंदी आणि लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने लोकल ट्रेन, एक्स्प्रेस सेवा बंद केली आहे.
हेही वाचा...विमानात 'कोरोना'बाधित प्रवासी..! वैमानिकाने चक्क खिडकीतून मारली उडी
लोकल सेवा बंद करताना आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या विशेष बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकल सेवा बंद केल्याने मुंबईकरांची गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले आहेत. मुंबईची लाईफ लाईन बोलली जाणाऱ्या रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु ठेवण्यास नकार दिला, मात्र अशावेळी मुंबईची दुसरी लाईफलाईन मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धावून आली आहे.
आज (सोमवार) सकाळपासून बेस्ट प्रशासनाने मुलुंड, ऐरोली, कळंबोली, दहिसर पासून सीएसएमटी कुलाबापर्यंत १९३८ बसेस सोडल्या. या बसेसमधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल, पालिका कार्यालये, पोलीस स्टेशनपर्यंत सोडले यामुळे बंदच्या काळातही आरोग्य सेवा सुरळीत आहे. नागरिकांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात आला असून कचऱ्याची सफाईही करण्यात आली आहे.