मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार ( Mumbai Corona Update ) आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र, मे महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे मुंबईमधील श्रीमंतांचे विभाग म्हणून ओळख असलेल्या विभागातच कोरोना विषाणूचे रुग्ण वाढल्याची आकडेवारी समोर आली ( Mumbai Corona Cases Increased ) आहे. या श्रीमंत विभागांवर लक्ष असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेल्या दोन वर्षात १० लाख ७५ हजार २४३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४७ हजार ६७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १९ हजार ५७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७९९८ सक्रिय रुग्ण ( Mumbai Active Corona Cases ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७३३ दिवस इतका आहे. मुंबईत पहिल्या लाटेत २८००, दुसऱ्या लाटेत ११ हजार तर तिसऱ्या लाटेत दिवसाला २१ हजार, अशी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
श्रीमंत विभागात कोरोनाचा अधिक प्रसार -मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेले दोन दिवस १७०० च्या वर रुग्ण आढळून आले असून, सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार इतकी झाली आहे. २ जून ते ८ जून या कालावधीत अंधेरी पश्चिम येथे ८३७, बांद्रा पश्चिम येथे ६०५, ग्रॅण्ट रोड मलबार हिल येथे ५३२ रुग्ण आढळून आले आहेत. हे तीनही विभाग मुंबईमधील श्रीमंत विभाग म्हणून ओळख असलेले आहेत. याच विभागात बॉलिवूडचे चित्रपट निर्माते करण जोहर याने आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील ऋतिक रोशन, कतरिना कैफ, करिना कपूर, सैफ अली खान, सलमान खान आदी कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यापैकी अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांना कोरोनाची लागण झाली होती.
पालिकेचे लक्ष - मुंबईमधील श्रीमंत विभागात कोरोनाचे सार्वधिक रुग्ण आढळून येत असल्याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. या विभागात आधीपासून कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. या विभागांवर पालिकेचे लक्ष आहे. हाय रिस्क रुग्णांकडे लक्ष दिले जात आहे. या विभागात टेस्टिंग जास्त होत असल्याने रुग्णांची संख्या जास्त येतेय का हे पाहावे लागेल. जे रुग्ण पॉजिटीव्ह येत आहेत ते लक्षणे नसलेले आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडत नाही, ऑक्सिजनची गरज पडत नाही यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन गोमारे यांनी केलं आहे.
रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, १७०२ रुग्णांची नोंद झाली आहे.
१०४ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा -Accident CCTV Video : सी-लिंकवर पक्ष्याचे प्राण वाचवणे बेतले जीवावर; टॅक्सीने दिलेल्या धडकेत दोन जणांना मृत्यू