मुंबई - हैदराबादमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येने संपूर्ण देशात खळबळ झाली होती. परंतु, अद्याप महिलांवरील अत्याचाराची कित्येक प्रकरणे प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महिलांवरील अत्याचारांविरोधात 'आप'चे अन्नत्याग आंदोलन; आझाद मैदानावर कार्यकर्ते आक्रमक रखडलेल्या शिक्षांचा तत्काळ निकाल लागावा यासाठी आम आदमी पक्षातर्फे आझाद मैदान येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे.
महिलांवर होणारे अत्याचार तसेच पोलीस तपासात होणारा विलंब हे घटक तितकेच जबाबदार असल्याचे यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी अशा प्रकारचे सर्व खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आझाद मैदानावार अन्नत्याग करत आंदोलनाला बसल्या आहेत.
याच मागण्यांसोबत संसदेतील बलात्काराचे आरोप असणाऱ्या लोकप्रतिनिधींना निलंबीत करण्यात यावे, महिलांसाठी सार्वजनिक सडक सुरक्षेचा विचार व्हावा अशा विविध मागण्या घेऊन या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. महिलांवर अत्याचार केलेल्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम आदमी पक्षाच्या महिला आयोग अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहे. सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. तरीही सरकारला जाग येत नसल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी आम्ही राज्यात प्रत्येक ठिकाणी आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सरकार आम्हाला शाश्वती देत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेऊ, असे आपच्या महाराष्ट्र महिला पदाधिकारी अॅड. सुमित्रा श्रीवास्तव यांनी सांगितले.