मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या आजच्या शेवटच्या सभेत सुमारे २०० प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच, ९७ टक्के प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहेत. पालिकेचा कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच, ७ तारखेला स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आता हे प्रस्ताव मंजुरीला येणार आहेत. दरम्यान आजच्या बैठकीत भाजपाकडून बॅनरबाजी करण्यात आली.
विशेष कॅगद्वारे ऑडिट करा -
मुंबई महानगरपालिकेची आज शेवटची स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली होती. आजच्या सभेसमोर मुंबईमधील विकासकामांचे १७९ नव्याने तर, याआधीच्या सभेतील काही प्रस्ताव असे एकूण सुमारे २०० प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. आजची स्थायी समितीची सभा अडीच वाजण्याच्या दरम्यान सुरू होऊन साडेतीन वाजता एका तासांत आटोपण्यात आली.
बैठकीत २०० पैकी ९७ प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवण्यात आले आहेत. यावर बोलताना जे प्रस्ताव चुकीचे आले आहेत, त्यावर प्रश्न उपस्थित करून उत्तरे घ्यावीत, अशी भूमिका भाजपाची आहे. गेले २ वर्षे पालिकेच्या भ्रष्टाचारावर आवाज उचलत आहोत. कोविड काळात ३ हजार ८०० कोटींचा खर्च करण्यात आला. त्यावर विशेष कॅगद्वारे ऑडिट करावे, अशी मागणी आम्ही केली आहे. यावर भाजपा सतत आवाज उचलत आला असल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.