मुंबई - एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात वास्तव्याला असलेले ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी टाळेबंदीमुळे स्वतः च्या गावी जाऊ शकत नव्हते. या विद्यार्थ्यांनी अमित ठाकरे यांच्याशी याबाबत फोनवर संपर्क साधून स्वतः ची कैफियत मांडली होती. अखेर अमित ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला होता. ठाकरे यांच्या सततच्या पाठपराव्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची सूत्र फिरली आणि या विद्यार्थ्यांची पहिली बॅच आज एसटी बसने पुण्याहून त्यांच्या मूळ गावांकडे रवाना झाली.
हेही वाचा...'हाच का तुमचा गरिबांना मारण्याचा, त्यांची क्रूर चेष्टा करण्याचा, हाच का तो तुमचा सायन पॅटर्न?'
ग्रामीण भागातून पुण्यात एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या दखल अमित ठाकरे यांनी गंभीररित्या घेतली होती. मुख्यमंत्री कार्यालयाशी याबाबत दूरध्वनीवर संपर्क साधला आणि या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय त्यांंना सांगितली. या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावांकडे घरी जाण्याची तत्काळ व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती अमित ठाकरे यांनी केली होती. दोन दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अमित ठाकरे यांना देण्यात आले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
अमित ठाकरेंचे मानले आभार...
'अमित ठाकरे यांनी पुण्यामध्ये एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची तत्काळ सोय करण्यात यावी, यासाठी पुढाकार घेतला. तसेच अमित ठाकरे यांनी फोनवर आमच्याशी चर्चा केली आणि मोठ्या आस्थेने आमची विचारपूस केली. आमच्या अडचणीच्या काळात अमित ठाकरे तात्काळ धावून आले. आम्ही सगळे विद्यार्थी त्यांचे आभार मानतो' असे ट्वीट 'एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य’ने केले आहे.