मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र, रविवारी ११ एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षांसंबंधित गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एमपीएससी परीक्षेबाबत शासनाला विचारणा केली होती. त्यानंतर आता परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -दहावी - बारावीच्या परीक्षेचा निर्णय मुख्यमंत्री घेणार, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण
परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारने रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरता मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यात शनिवारी व रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परीक्षा होणार की नाही अशा संभ्रमात विद्यार्थी होते. यापूर्वीसुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने १४ मार्च २०२१ला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शासनाच्या निर्णया विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले. सध्या परिस्थिती त्याहीपेक्षा भयंकर असल्यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रमात होता. मात्र, आता या संदर्भात महत्त्वाचा निर्णय समोर आलाय. एमपीएससीची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे.
हेही वाचा -उद्धवच्या हातात राज्य आहे की, त्याच्यावर कुणाचं राज्य आलंय -राज ठाकरेंची कोपरखळी
प्रवासाची व्यवस्था करावी -
एमपीएससीची परीक्षा होणार की नाही यामध्ये विद्यार्थी संभ्रमात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी शासनाला यासंबंधीत विचारणा केली होती. रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून रविवारी ११ एप्रिलला एमपीएससी परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसेच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करायची मागणी केली होती.