मुंबई- गरीब आणि गरजू रुग्णांना महापौर निधीमधून आर्थिक मदत केली जाते. रुग्णांना देण्यात येणाऱ्या मदत निधीमध्ये मागील महिन्यात वाढ करण्यात आली. मदत निधीमध्ये वाढ केल्यावर महापौर निधीमध्ये वाढ करता यावी म्हणून सोमवारी महापौरांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबईमधील खासदार, आमदार, नगरसेवक यांनी आपले एका महिन्याचे मानधन द्यावे तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचा पगार द्यावा असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. मुंबईमधील उद्योगपतींकडूनही महापौर निधीसाठी मदत मागतील जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
महापौर निधीमधून २०११ पासून प्रत्येक गरजू रुग्णाला ५ हजार रुपये इतकी मदत केली जात होती. महापौर निधी समितीची बैठक होत नसल्याने व महापौर निधीमध्ये वाढ होत नसल्याने या निधीमध्ये गेल्या आठ वर्षात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नव्हती. महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळेल या अपेक्षेने मुंबईकर मोठ्या प्रमाणात महापौरांकडे अर्ज करतात. मात्र निधी नसल्याने गरजू रुग्णांना जास्त रक्कम देता येत नव्हती. महापौर निधीमधून देण्यात आलेले ५ हजार रुपयांचे धनादेश अनेक रुग्णालये स्वीकारत नव्हती. यामुळे महापौर मदत निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.