मुंबई/नवी दिल्ली - देशातील वेगवेगळ्या राज्यांत करोना लसीची कमतरता जाणवत आहे. महाराष्ट्रातील लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आलेली आहेत. यामुळे केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला त्वरित पुरेशा प्रमाणात कोविड लसींचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केली. दिल्लीत आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन खासदार शेवाळे यांनी दिले.
महाराष्ट्राला त्वरित 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची खासदार राहुल शेवाळेंची मागणी - News about Maharashtra Corona Vaccination
महाराष्ट्राला त्वरित 40 लाख लसींचा पुरवठा करा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. दिल्लीत आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन खासदार शेवाळे यांनी दिले.
आपल्या निवेदनात खासदार शेवाळे यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्याने लसीकरणात देशभरात आघाडी घेतली आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात दररोज साडे चार लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. केंद्राकडून लसीच्या होणाऱ्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे राज्यात आजमितीला, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन्ही प्रकारच्या लसी मिळून केवळ 14 लाख मात्रा शिल्लक आहेत, तर मुंबईतही केवळ 1 लाख 76 हजार लसींच्या मात्रा शिल्लक आहेत. यातून केवळ पुढचे 3 दिवसांचे लसीकरण केले जाऊ शकते. पुणे, पनवेल यांसारख्या काही शहरांत तर पुरावठ्या अभावी आत्ताच लसीकरण मोहीम स्थगित करण्यात आली आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.
"केंद्र सरकारने 15 एप्रिलपूर्वी महाराष्ट्रात लसींचा पुरवठा करण्यास असमर्थता दाखविली आहे. दुसरीकडे मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि इतर राज्यांना मात्र रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक लसींचा पुरवठा केला जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून महाराष्ट्रात कोविड लसींचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे. याबाबत सकारात्मक पाऊले उचलण्याची हमी त्यांनी दिली आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.