मुंबई - आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली ( MP Rahul Shewale letter For Support BJP presidential candidat ) आहे. याविषयीचे पत्र खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन दिले आहे. यामुळे शेवाळे शिंदे यांच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. ( MP Rahul Shewale Letter to Shiv Sena Chief Uddhav Thackeray )
खासदार शेवाळेंची मागणी - रालोआच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा खासदार शेवाळे यांनी पत्रात केली आहे. तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्त्वाचा आदर करत त्यावेळी देखील शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हीच परंपरा कायम ठेवत, आदिवासी समाजातील एका कर्तृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा. त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे.