मनपा सफाई कामगारांना घरकुल योजनेअंतर्गत कार्यस्वरूपी घरे द्यावी, खासदार राहुल शेवाळेंची मागणी
मुंबई शहर आणि उपनगराच्या स्वच्छतेची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना घरकुल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घरे द्यावीत, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुंबई -मुंबई शहर आणि उपनगराच्या स्वच्छतेची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना घरकुल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घरे द्यावीत, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन खासदार शेवाळे यांनी सादर केले.
खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई शहर आणि उपनगराच्या स्वच्छतेचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये करतात. यासाठी त्यांची निवासस्थाने त्यांच्या विभागालगतच्या क्षेत्रात असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत, मुंबई शहर आणि उपनगरांमधील एकूण 46 वसाहतींमध्ये 5,592 कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहेत. या वसाहती 1962 साली उभारण्यात आल्या असून त्यांतील निवासस्थाने केवळ 150 चौरस फुटांची आहेत. आयुष्याची 30-40 वर्षे पालिकेची चाकरी करूनही या कामगारांना मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर घेता येत नाही. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना सदर निवासस्थान सोडावे लागते.
अशा परिस्थितीत, पालिका कर्मचाऱ्यांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी पालिकेच्या जागांवर 'घरकुल' योजना राबविण्याची बाब शिवसेनेच्या वचननाम्यातही नमूद करण्यात आली होती. सध्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी आश्रय योजनेअंतर्गत कंत्रादाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया स्थायी समितीने पूर्ण केली आहे. त्यामुळे या आश्रय योजनेमध्येच 'घरकुल' योजनेचा अंतर्भाव करून पालिकेच्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे देऊन उर्वरित सदनिका सेवानिवासस्थाने म्हणून वापरता येतील, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.