मुंबई- खासदार पूनम महाजन यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात सर्वाधिक निधी खर्च केल्याची माहिती त्यांच्या कार्य अहवालासह संसदेतील निधी खर्चाच्या आकडेवारीत दिसून आली आहे. खासदार पुनम महाजन यांनी आपल्या कार्यकाळात इतर खासदारांच्या तुलनेत बहुतांश निधी टॉयलेटवर खर्च केला आहे.
उत्तर मध्य लोकसभा मतदार संघ
मागील पाच वर्षांत स्थानिकांना पुरविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सोयी-सुविधांवर त्यांचा भर आहे. त्यातही त्यांनी नागरिकांना टॉयलेट बांधून देण्यावर सर्वाधिक भर दिल्याचे चित्र त्यांच्या कार्यअहवालातून समोर आले आहे. त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 1 हजार 428 सार्वजनिक शौचालये बांधली असून त्यासोबतच कम्युनिटी हॉल, विविध रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक, इनडोअर आणि ओपन जिम्नॅशियम, झोपडपट्टीच्या परिसरात खासगी मुतारी, मंदिर आणि उद्यानांचे सुशोभिकरण आदी अनेक कामांसाठीही त्यांनी आपला निधी खर्च केला आहे.
यंदाच्या अखेरच्या वर्षांत त्यांनी कुर्ला विधानसभा क्षेत्रात आणि विशेषत: विमानतळांच्या परिसरातील झोपडपट्ट्यांतील विकास कामांवर लक्ष वेधले होते. त्या सोबतच येथील जुन्या इमारतींच्या विकास कामांवर भर देत त्यांच्या पुनर्विकासाचे कामही मार्गी लावले. त्या म्हणतात, की माझ्या कार्यकाळात मी जनतेच्या विकासासाठी सर्वाधिक निधी खर्च केला. त्यात लोकांच्या घरांचे प्रश्न होते, त्याचेही मी निवारण केले.
महाजन यांच्या लोकसभा मतदार संघात कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना आणि चांदिवली हे विधानसभा मतदार संघ येतात. या मतदारसंघात महाजन यांनी सर्वाधिक भर हा टॉयलेट बांधण्यावर दिल्याचे त्यांचे कार्यकर्तेही सांगतात.
भाजपच्या युवा मोर्चाचे कलिना विधानसभा अध्यक्ष आदित्य पानसे सांगतात, की पुनम महाजन यांनी मागील पाच वर्षांत कलिना विधानसभा मतदार संघात समाजमंदिरांपासून ते शौचालये बांधून देण्यात सर्वात जास्त काम केले. महिलांच्या जनजागृतीसाठी काही कॅम्पेन चालविण्यात आले. अनेक शाळांच्या विकासासाठी त्यांनी आपला निधी खर्च केला.
कुर्ला पश्चिमेला असलेल्या नेताजी नगर जवळील सम्राट नगर या परिसरातील महिलांचे म्हणणे हे वेगळे आहे. मनोरमा गुप्ता या म्हणाल्या, की आमच्यासमोर पाण्याचा मोठा प्रश्न आहे, मात्र त्यासाठी कोणी लक्ष देत नाही. आम्हाला खासदार कोण आहेत, हेच माहीत नाही, त्यांनी काय काम केली हेही माहीत नाही.
नूतन सोनवणे म्हणतात, मी मागील सात वर्षांपूर्वी येथे लग्न करून आले, परंतु तेव्हापासून पाणी, रस्ते, कचऱ्याचा प्रश्न कोणी सोडवत नाही. सगळे प्रश्न पडून आहेत. खासदार मात्र निवडणुकीच्या काळात येतात, पुन्हा पाहत नाहीत, त्यामुळे सामान्य जनतेने काय करायचे, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.
चांदिवली विधानसभा मतदार संघात बहुतांश ठिकाणी फेरीवाल्यांमुळे शाळकरी मुलांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. तरुणांच्या रोजगारांसोबत कचरा आदींचे प्रश्न कायम राहिलेले असल्याने या परिसरातील तरूणांनी खासदार पुनम महाजन यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर महाजन या आमच्याकडे फिरकल्या नाहीत, असेही अनेक महिला मतदारांना वाटते. तर काहींनी आम्हाला आमच्या खासदार कोण आहेत, हेच माहीत नसल्याचे सांगितले. तर साकीनाका येथील विक्रम सोनटक्के या मतदाराने पुनम महाजन यांनी काहीच कामे केली नसल्याचे सांगत राग व्यक्त केला.
यापूर्वी या मतदार संघात सर्वात मोठा प्रश्न शौचालयाचा होता. त्यासाठी कधीही अशाप्रकारे खासदार निधी वापरता आला नाही. तो पुनम महाजन यांनी वापरला. त्यांनी पहिल्यांदाच ग्राऊंड प्लस वन, अशा प्रकारचे शौचालय आपल्या निधीतून बांधले. यातून सुमारे तीन हजारांहून अधिक महिलांचा प्रश्न यामुळे सुटला. वांद्रे पूर्व, चांदिवली, कुर्ला पूर्व, कलिना आदी परिसरात ती उभी राहिली. पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी पाईपलाईनसाठी निधी खर्च केला. अनेक ठिकाणी उजेड पोहोचवला. एलईडी दिवे पोहोचवले, अशी माहिती पुनम महाजन यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.
पुनम महाजन या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव करत 1 लाख 86 हजार मताधिक्क्यांनी विजयी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात संसदेच्या कामकाजात 79 टक्के उपस्थिती लावली होती. तर 444 प्रश्न आणि 9 खासगी विधेयके त्यांनी मांडली होती. त्यासह त्यांनी अने प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी आपल्या खासदार निधीचा वापर मुंबईतील इतर खासदारांच्या तुलनेत सर्वाधिक केल्याचे त्यांच्या कार्यअहवालातून दिसून येते.