मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. 23 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत 1 लाख 99 हजार 912 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 1 लाख 86 हजार 158 आरोग्य कर्मचारी तर 13 हजार 754 फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. मुंबईत सर्वाधिक लसीकरण पालिकेच्या नायर, केईएम, बिकेसी जम्बो सेंटर आणि राजावाडी रुग्णालयात झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
याठिकाणी सर्वाधिक लसीकरण
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मोहीम स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात सर्वाधिक म्हणजेच 22 हजार 706 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्या खालोखाल परळ येथील केईएम रुग्णालयात 20 हजार 928, घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये 17 हजार 504, कांदिवली येथील डॉ. आंबेडकर हॉस्पिटल म्हणजेच शताब्दी रुग्णालयात 16 हजार 857, अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयात 11 हजार 888, विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात 11 हजार 823 लाभार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत काल बुधवारी 34 लसीकरण केंद्रांवर 108 बूथवर 5000 आरोग्य कर्मचारी तर 5800 फ्रंटलाइन वर्कर अशा एकूण 11, 800 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा 91 टक्के म्हणजेच 9 हजार 830 लसीकरण करण्यात आले. त्यातील 6 हजार 481 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 369 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 9 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आतापर्यंत 1 लाख 86 हजार 158 लाभार्थ्यांना पहिला तर 13 हजार 754 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 लाख 99 हजार 912 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.