मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा प्रसार होत असताना अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियोजित स्थळी पोहचवण्याचे काम 'बेस्ट उपक्रमा'ने केले. तेव्हापासून आतापर्यंत अत्यावश्यक सेवा देताना बेस्टचे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आतापर्यंत बेस्टच्या २ हजार २२५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील २ हजार ५ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे तर ३५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत गेले सहा महिने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या कामात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व्यग्र आहेत. देशभरात लॉकडाऊन असल्याने रेल्वे बंद आहेत. प्रवासी वाहतूक बंद असताना अत्यावश्यक सेवेत असलेले डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांना बेस्टच्या बसने कामाच्या ठिकाणी व घरी पोहचवण्याचे काम बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत होते. आता तर सरकारने 'मिशन बिगीन'अंतर्गत सर्वच प्रवाशांना बेस्टच्या बसेसमधून जाण्याची परवानगी दिल्याने प्रवाशांची गर्दी वाढत आहे. यामुळे प्रवाशांच्या संपर्कात आल्याने बेस्ट कर्मचारी विशेष करून चालक, वाहक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.