मुंबई - शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम सध्या वेगाने सुरू असून आतापर्यंत जवळ जवळ 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच कोस्टल रोडसाठी बोगदा खोदण्याचे कामही प्रगतीपथावर सुरु आहे. मावळा या टीबीएम मशीनद्वारे हा बोगदा खोदण्यात येत असून १०० मीटरपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडसाठी खोदण्यात येणाऱ्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली आहे.
कोस्टल रोड प्रकल्प -
दक्षिण मुंबईमधून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेने कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे. शामलदास गांधी मार्गावरील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा असणारा 'सागरी किनारा मार्ग' बांधल्यामुळे प्रवासाच्या वेळेत ७० टक्क्यांची तर ३० टक्के इंधन बचत होणार आहे. पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे. कोस्टल रोडवर २ किलोमीटरचे २ बोगदे खोदले जाणार आहेत. प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या 'छोटा चौपाटी'पर्यंत असणार असून ते 'मलबार हिल' च्या खालून जाणार आहेत. सदर दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे. त्यासाठी मावळा या टीबीएम मशीनचा वापर केला जात आहे. बोगदे खोदण्याच्या कामाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ११ जानेवारी रोजी करण्यात आली. बोगदे खणण्याच्या कामाचे १०० मीटरचे अंतर पूर्ण झाले आहे.
हे ही वाचा - मुंबई कोरोना अपडेट, आज 1646 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
दोन्ही महाबोगदे खणण्यासाठी प्रत्येकी साधारणपणे ९ महिने लागणार असून दोन्ही बोगद्यांसाठी २ महिन्याचा अतिरिक्त कालावधी ज़मेस धरण्यात आला आहे. यानुसार महाबोगदे खणण्यासाठी सुमारे २० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मावळा या संयंत्राद्वारे बाहेर टाकण्यात येणा-या पाण्याचा पुनर्वापर करता यावा, यासाठी 'प्रक्रिया केंद्र' देखील प्रकल्पाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहे. तर खोदकामातून निघणारे खडक व खडी याचा उपयोग भराव कामासाठी करण्यात येणार आहे.