मुंबई -राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon session ) 18 जुलैपासून सुरू होणार होते. मात्र जून महिन्याच्या अखेरीस राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. गेला महिनाभरात राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारला आपला मंत्रिमंडळ विस्तार करता आला नाही. सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाचा पेच सुरू असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित होत नव्हती. मात्र आता अधिवेशनाला मुहूर्त मिळाला असून येत्या बुधवारपासून अधिवेशन घेण्यात येणार आहे. याबाबत विधिमंडळाने कर्मचाऱ्यांना एका परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे.
दोनच मंत्र्यांचे मंत्रिमंडळ :राज्यात गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळ केवळ दोनच मंत्र्यांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे. यामुळे विविध प्रश्न निर्माण झाले असून जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले असले तरीही काही अपरिहार्य कारणामुळे शिंदे फडणवीस सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नव्हता. अखेरीस 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.