मुंबई - चेंबूर ते जेकब सर्कल अशी चालणारी मोनोरेल आता लवकरच दोन टप्प्यात धावणार आहे. चेंबुर ते वडाळा आणि वडाळा ते जेकब सर्कल असे दोन टप्पे असतील. तर पहिल्या चेंबूर ते वडाळा दरम्यान दोन मोनो गाड्या तर वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान चार गाड्या चालवण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने घेतल्याची माहिती आर ए राजीव, महानगर आयुक्त यांनी दिली आहे. चेंबूर ते वडाळा दरम्यान प्रवाशी संख्या कमी असून सलग 20 किमी मोनो धावत असल्याने दोन गाड्यांच्या मध्ये बरेच अंतर पडत आहे. ही बाब लक्षात घेत आता दोन टप्प्यात मोनो सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचेही राजीव यांनी सांगितले आहे.
चेंबूर ते वडाळादरम्यान केवळ एक तृतीयांश प्रवाशी -
चेंबूर ते जेकब सर्कल असा 20 किमीचा मोनोरेल प्रकल्प हा देशातील पहिला-वहिला प्रकल्प आहे. मात्र हा प्रकल्प आजतागायत तोट्यात सुरू असून एमएमआरडीएसाठी हा पांढरा हत्ती ठरत आहे. संपूर्ण 20 किमीचा टप्पा सुरू होऊन ही प्रवाशी संख्या कमीच आहे. त्यातही चेंबूर ते वडाळा दरम्यान एक तृतीयांश तर वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान दोन तृतीयांश प्रवासी प्रवास करतात. म्हणजेच चेंबूर ते वडाळादरम्यान खूपच कमी प्रवाशी असतात. तर वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान प्रवाशी वाढतात, अशी बाब निदर्शनास आली आहे.
आता फ्रिक्वेन्सी वाढणार -
सध्या एमएमआरडीएकडे सात गाड्या असून आतापर्यंत यातील 5 गाड्या धावत आहेत. तर आता एक गाडी दुरुस्त झाली असून लवकरच आणखी एक गाडी दुरुस्त होऊन सेवेत दाखल होणार आहे. पण गाड्या कमी असल्याने आणि 20 किमीचे अंतर असल्याने मोनोच्या फेऱ्या वाढवता येत नाहीत, की फ्रिक्वेन्सी वाढवता येत नाही अशी अडचण एमएमआरडीएसाठी निर्माण झाली होती. गाड्या कमी असल्याने आणि अंतर खूप असल्याने 30 ते 35 मिनिटांच्या अंतराने मोनो धावत आहे. ही बाब लक्षात घेत आता एमएमआरडीएने चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते जेकब सर्कल अशा दोन टप्प्यात मोनो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे. असे झाल्यास फ्रिक्वेन्सी किमान 18 मिनिटांवर येणार असून ही प्रवाशासाठी दिलासादायक बाब ठरणार असल्याचेही राजीव यांनी सांगितले आहे.
अशा धावणार मोनो -
..यामुळे चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते जेकब सर्कल अशी धावणार मोनो - मोनो रेल
चेंबूर ते वडाळा दरम्यान दोन मोनो गाड्या तर वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान चार गाड्या चालवण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने घेतला आहे. कमी प्रवाशी संख्या आणि दोन गाड्यामधील अंतर लक्षात घेता एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे.
नव्या निर्णयानुसार लवकरच मोनोच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार आहे. सध्या 6 मोनो गाड्या चालत असून यातील 2 गाड्या चेंबूर ते वडाळा अशा तर 4 गाड्या वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान चालवल्या जाणार असल्याचे राजीव यांनी सांगितले आहे. यामुळे फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. तेव्हा एमएमआरडीएचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
कांजूर कारशेडवर बोलण्यास नकार -
मेट्रो 3, 6, 4 आणि 14 चे कारशेड कांजूर मार्ग येथील एका जागेवर बांधले जात आहे. मात्र मेट्रो 3 च्या अनुषंगाने कांजूर येथील जागेला विरोध होत आहे. तर केंद्राने आणि खासगी बिल्डरांनी या जागेवर मालकी हक्क दाखवत हा वाद थेट उच्च न्यायालयात नेला आहे. यावरील सुनावणी दरम्यान आज न्यायालयाने राज्य सरकारला आणि एमएमआरडीएला दणका दिला आहे. कारशेडच्या कामाला फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे आता काम रखडणार असून त्याचा मोठा फटका मेट्रो प्रकल्पाना बसणार आहे. तेव्हा याविषयी राजीव यांना विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी न्यायालयाच्या आदेशाची प्रत आल्यानंतर यावर बोलू असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.