मुंबई - दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक व माफिया करीम लाला याचा नातेवाईक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंकू पठाण याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. यानंतर मुंबईतील डोंगरी परिसरामध्ये छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारी दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांसह, दोन कोटी रुपयांची रोकड व शस्त्र मिळून आली आहेत. यानंतरच्या कारवाईमध्ये शुक्रवारी एनसीबीकडून पुन्हा मुंबईत काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या दरम्यान पोलिसांना चिंकू पठाणकडे असलेली डायरी मिळून आली आहे. या डायरीमध्ये मुंबई शहरात अमली पदार्थांची तस्करी करणारे व अमली पदार्थांची मागणी करणाऱ्या ग्राहकांची यादी एनसीबीच्या हाती लागलेली आहे. यामध्ये काही उद्योगपती व सेलिब्रिटींची नावं असल्याचं सूत्रांचे म्हणणे आहे.
दहशतवाद्यांना केला जात होता आर्थिक पुरवठा
आतापर्यंतच्या तपासानुसार मुंबईतून अमली पदार्थांच्या माध्यमातून दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केला जात असल्याचे समोर येत आहे. दाऊदचा खास हस्तक चिंकू पठाण हा त्याच्या इतर अमली पदार्थ तस्करांसोबत मिळून मुंबईत अमली पदार्थांची विक्री करून दहशतवाद्याना आर्थिक पुरवठा करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास 1500 कोटी रुपयांचे ड्रग्स मुंबई शहरात विकले गेले असून हवालामार्गे हा पैसा परदेशात पाठवण्यात आल्याचेही समोर आले आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये डोंगरी परिसरातील चार ठिकाणी धाडी मारण्यात आल्या असून 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईत विकले जाणारे अमली पदार्थ व दहशतवादाला हवालामार्गे होणारा आर्थिक पुरवठा लक्षात घेता आता यापुढे जाऊन सीबीआय, ईडी देखील यामध्ये तपास करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
12 किलो अमली पदार्थ, 2 कोटी 80 लाखांची रोकड जप्त