मुंबई - 'एनएसईएल'शी संबंधित मनी लॉन्ड्रिग प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. प्रताप सरनाईक यांच्यावर टिटवाळ्यातील कोट्यवधींची जमीन खरेदी-विक्री घोटाळ्याचा आरोप आहे. प्रकरण निकाली निघेपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोणतीही कठोर कारवाई करू नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मात्र याप्रकरणात अद्याप समन्सच बजावण्यात आले नसल्याची माहिती ईडीच्या वतीने सुनावणीदरम्यान हायकोर्टात देण्यात आली. यावर समन्स बजावण्यात आले नसले तरी, ईडीकडून एका प्रकरणात चौकशीला बोलावण्यात येते आणि दुसऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचा आरोप न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांनी याचिका दुरुस्तीसाठी उच्च न्यायालयात वेळ देखील मागितला आहे. याचिकाकर्त्यांना याचिकेत बदल करण्याची संधी देत, न्यायालयाने सुनावणी गुरुवार 24 जूनपर्यंत तहकूब केली.
नेमके काय आहे प्रकरण?
तब्बल 5,500 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. 'एनएसईएल' म्हणजेच नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात यावर्षी एप्रिल महिन्यात विकासक योगेश देशमुख यांना अटक झाली होती. 'आस्था ग्रुप' या काळ्या यादीतील कंपनीसोबत 'एनएसईएल'च्या माध्यमातून 250 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपवर करण्यात आला आहे. विहंग आणि आस्था ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमातून विहंग हाऊसिंग नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्यातंर्गत विकासक देशमुख यांच्या मदतीने टिटवाळा येथील अनेक जमिनी खरेदी करण्यात आल्या. त्यातील काही जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
'ईडी'कडून भूखंड जप्तीची कारवाई
दरम्यान 2014 मध्ये ईडीने टिटवाळ्यातील हा भूखंड जप्त करून, प्राधिकरणाकडून भूखंड जप्तीची पुष्टी केली होती. तसेच या जागेचा कोणताही व्यवहार होऊ नये, म्हणून ईडीने स्थानिक महसूल प्राधिकरणास जप्तीबाबत माहिती दिली होती. मात्र, जानेवारी महिन्यात सरनाईक यांच्या मदतीने विकासक देशमुख यांनी ईडीनं जप्त केलेला भूंखड व्रिकीसाठी काढल्याची बाब निदर्शानस आल्यानंतर, ईडीने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. टॉप्स ग्रुप या खासगी सिक्युरिटी फर्मशी संबंधित मनी लॉन्ड्रिग प्रकरणात तूर्तास प्रताप सरनाईक यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.
हेही वाचा -शंभर कोटी वसुली प्रकरणी चांदीवाल यांच्यासमोर सचिन वाझेची नोंदवली साक्ष