मुंबई -क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणांमध्ये आता भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज भारतीय यांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात एक नवीन नाव त्यांनी समोर आणलं आहे. सुनील पाटील असं त्या व्यक्तीचे नाव असून, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ड्रग्स प्रकरणाच्या संपूर्ण षड्यंत्रामागे सुनील पाटील हा मुख्य सूत्रधार असून, राष्ट्रवादीसोबतच नाहीतर सरकारमधील विविध मंत्र्यांशी त्याची जवळीक आहे, असा आरोप मोहित कंबोज यांनी मुंबईमध्ये एका पत्रकार परिषदेत केला आहे.
- सुनील पाटीलवर गंभीर आरोप -
सुनील पाटील हा खूप वर्षांपासून बदलीचे रॅकेट चालवत होता. 2014 ला जेव्हा सरकार बदलले तेव्हा तो गायब झाला. मात्र, पुन्हा 2019 ला सरकार आले तेव्हा तो पुन्हा सक्रिय झाला. ड्रग्स पार्टीचे आयोजन देखील तो करतो.
मागील महिन्याच्या 2 तारखेपासून आर्यन खान ड्रग्स प्रकरण सुरू आहे. नवाब मलिकांनी ६ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि एनसीबीचे संबंध आहेत असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात तथ्य नसून काय खरे आहे ते या पत्रकार परिषदेमध्ये मोहित कंबोज यांनी सांगितले. प्रभाकर साईल याला मलिकांनी कशा प्रकारे सर्वांसमोर आणले, त्या सगळ्याचे पुरावे देत, कशा पद्धतीने खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला हेसुद्धा मोहित कंबोज यांनी सांगितले.
हेही वाचा -वानखेडेंच्या चौकशीसाठी दोन एसआयटीची स्थापना; नवाब मलिक यांचे ट्विट
- किरण गोसावी हाच एनसीबी अधिकारी -
सॅम डिसूझा याचा उल्लेख आजवर सर्वांनी केला. सुनील पाटील याने सॅम डिसूझा याला whats app चॅट केले आणि कॉल देखील करत सांगितले की मुंबईत क्रूझ पार्टी होत आहे. त्यात 27 लोकांची नावे असून, मला एनसीबीशी मिळवून दे, असे सॅम डिसूझा याला सुनील पाटील याने सांगितले.
२ तारखेला सुनील पाटील याने सॅम डिसूझाला सांगितले की, माझ्या माणसाला एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी भेट करून द्या. त्यानंतर सुनील पाटील याने किरण गोसावी याचा नंबर सॅम डिसूझा याला दिला. हा किरण गोसावी म्हणजेच एनसीबीचा अधिकारी आहे असे सांगितले गेले व तिथूनच या पूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली.
- या सर्व प्रकरणाची एनआयएकडून चौकशी झाली पाहिजे -
राष्ट्रवादीच्या जवळ असलेल्या या माणसाला या सर्वांची कशी काय माहिती मिळते हा प्रश्न आहे? मागील एक महिन्यात एक खोटी स्टोरी बनवली गेली. सुनील पाटील याला पुढे करून षडयंत्र रचले गेले. सुनील पाटील याच्यासोबत काय संबंध आहेत याचे उत्तर त्या मंत्र्यांना द्यावे लागेल. सुनील पाटील हा आताच्या गृहमंत्र्यांचे देखील नाव घेत आहे. किरण गोसावी हा सुनील पाटीलचा माणूस आहे. मोठ्या नेत्यांसोबत त्याने फोटो काढले आहेत. त्यात गुजरातच्या एका मंत्र्यांसोबत सुनील पाटील आणि किरण गोसावीचा फोटो आहे. असे सांगत या सर्व प्रकरणाची एनआयएकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.
भाजपचा विरोध करताकरता देशाचा विरोध करू लागले आहेत. राष्ट्रवादी ड्रग्सचे समर्थन करत आहे का? याचे उत्तर द्यावे लागेल. मनीष भानुशाली, किरण गोसावी, प्रभाकर साईल, सॅम डिसूझा, सुनील पाटील याचा एकमेकांशी संबंध असल्याचे स्पष्ट होते. यावरून हे एक षडयंत्र आहे, असेही मोहित कंबोज म्हणाले.
- ललित, सह्याद्रीमध्ये काय व्हायचं?
'द ललित हॉटेल'मध्ये सुनील पाटील याचा एक सूट बुक असायचा. ऋषीकेश देशमुख एक वर्ष ललित हॉटेलमध्ये काय करत होते? दोन गॅम, तीन ग्रॅम कोकेन हा गुन्हा होत नाही, असे राज्यातले हे मंत्री म्हणतात, असा आरोपही मोहित कंबोज यांनी केला आहे. लॉकडाऊनमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर अनिल देशमुख आणि दाऊदचा हस्तक भेटला. त्यावेळी तेथे एका मंत्र्यांचा जावई देखील होता, असा आरोप करत मोहित कंबोज यांनी या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनासुद्धा खेचले आहे.
हेही वाचा -आर्यन खानची जामीन मिळाल्यानंतर प्रथमच एनसीबी कार्यालयात चौकशी