मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोमवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत कोर्टाने नवाब मलिकांविरोधात खटला चालविला पाहिजे असे न्यायालयाने म्हटल्याचा दावा केला आहे. आपण दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवरून कोर्टाने हे म्हटल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे.
कंबोज यांचा दावा
मी नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. यावरून कोर्टाने हे षडयंत्र असल्याचे दिसत असल्याचे कोर्टाने म्हटल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. तसेच भादंवि कलम 500 अंतर्गत मलिक यांच्यावर खटला चालविला पाहिजे असे कोर्टाने म्हटल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे.
यासोबत काही फोटोही कंबोज यांनी ट्विटरवरून शेअर केले आहेत.
वानखेडेंच्या याचिकेवरून मलिक यांना कोर्टाचे निर्देश
ज्ञानदेव वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिकांविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या प्रकरणी नवाब मलिकांना मंगळवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने मलिकांना मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आणि पुढील सुनावणी बुधवारी ठेवली आहे. तसेच मलिक रोज सोशल मीडियावरून टार्गेट करत असल्याचं सांगत त्यांना सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापासून मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंतीही वानखेडे यांच्या वकिलाने केली आहे. तर वानखेडे यांच्या आरोपावर उद्याच उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने आज नवाब मलिक यांच्या वकिलांना दिले आहेत.
वानखेडेंचे आरोप
ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडणारे वकील अर्शद शेख यांनी न्यायालयाला सांगितले की नवाब मलिक यांच्याकडून दररोज काही खोटे आणि बदनामीकारक विधान केले जात आहेत ज्यामुळे सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबीयांबद्दल आणखी बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. आज सकाळीच मलिक यांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीबद्दल एक ट्विट पोस्ट केले आहे. तसेच किमान या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने एकतर मलिक यांना ज्ञानदेव वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल विधाने करण्यापासून रोखावे अशी मागणी अर्शद शेख यांनी केली.
सव्वा कोटींचा मानहानीचा दावा
ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्या दाव्यात नवाब मलिक यांच्याकडून त्यांचा मुलगा समीर वानखेडे आणि कुटुंबाविरुद्ध पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाद्वारे बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल सव्वा कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
मलिकांच्या वकिलांचा युक्तीवाद
नवाब मलिक यांचे वकील अतुल दामले यांनी दाव्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ मागताना न्यायालयाला सांगितले की, ज्ञानदेव वानखेडे आपल्या सज्ञान मुलांच्या वतीने बोलू शकत नाही आणि इतर व्यक्तींनी सोशल मीडियावर काय टिप्पणी केली आहे याचा दोष मलिकांना देता येणार नाही. शेख यांच्या या युक्तिवादानंतर प्रतिवादींनी यावर काही रिप्लाय फाईल केला आहे का? असा सवाल कोर्टाने केला. त्यावर मलिक यांचे वकील अतुल दामले यांनी मलिक यांची बाजू मांडली. आम्हाला एक दिवस आधीच याबाबतची नोटीस मिळाली आहे. आम्ही आमचे उत्तर 15 दिवसांनी दाखल करू. आम्हाला थोडा वेळ द्यावा अशी विनंती दामले यांनी केली.
10 नोव्हेंबर रोजी सुनावणी
जोपर्यंत रिप्लाय फाईल होत नाही तोपर्यंत मलिक यांनी सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू नये. आजच मलिक यांनी क्रांती रेडकर यांच्या बहिणीबाबत एक पोस्ट केली आहे असं शेख यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. तर या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्याची विनंती दामले यांनी केली. याबाबत उद्याच रिप्लाय दाखल करा असं सांगत कोर्टाने याप्रकरणी 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली. सोशल मीडियावर मलिक यांना पोस्ट करण्याबाबतचे कोणतेही निर्बंध कोर्टाने लावलेले नाहीत.