पुणे -समान पाणी पुरवठा योजना मार्गी लागत नाही, अशा तक्रारी म्हणजे अपयशाची खासदार गिरीश बापट ( Girish Bapat ) यांची कबुली आहे. महापालिकेत सत्ता असताना झोपा काढल्यात का, असा सवाल माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी ( Mohan Joshi Critisized Girish Bapat ) यांनी केला आहे. लोकसभेचे अधिवेशन चालू असतानाही भाजपाचे खासदार गिरीश बापट संसदेत गैरहजर आहेत. पुणेकरांनी त्यांना दिल्लीत पाठविले. पण, ते गल्लीतच अडकले, अशी अवस्था त्यांची आणि त्यांच्याबरोबर भाजपची झाली आहे, अशी टीका यावेळी मोहन जोशी यांनी केली आहे.
'बापटांची दिल्ली सोडून पुण्यात स्टंटबाजी' - पुण्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकार, राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदारांनी संसद अधिवेशन चालू असताना दिल्लीत राहाणे अपेक्षित आहे. अधिवेशन काळात सर्व खात्यांचे मंत्री, सचिव सहज उपलब्ध होतात आणि त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणे सोपे जाते. परंतु, खासदार गिरीश बापट दिल्लीत न जाता पुण्यातच थांबले आहेत आणि त्यांनी आपले आणि आपल्या पक्षाचे अपयश झाकण्यासाठी स्टंटबाजी चालविली आहे. समान पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण न झाल्याने बापट यांनी महापालिका प्रशासनावर राग काढलेला आहे. भाजपने ही योजना प्रतिष्ठेची केली. पण, हातात सत्ता असूनही गेल्या पाच वर्षात भाजप ही योजना मार्गी लावू शकलेले नाही आणि आता योजनेच्या कामाला गती मिळत नाही, अशी आगपाखड चालू केलेली आहे. आधीची पाच वर्षे बापटांकडे, पुण्याचे पालकमंत्रीपद होते. आता ते खासदार आहेत. या सर्व कालावधीत त्यांनी ही योजना मार्गी लावली असती तर, त्यांना दिल्ली सोडून पुण्यातच स्टंटबाजी करत अडकून पडावे लागले नसते, असं देखील यावेळी माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटलं आहे.