मुंबई - भारताचा शेजारी देश चीन, हा सीमेवर सातत्याने कुरापती काढत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले आहे. तसेच सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे, असा आरोप करत सरकारला याचा जाब विचारण्यासाठी तसेच २० हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसने आज (शुक्रवार) राज्यव्यापी आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
सध्या भारत-चीन सीमेवर जे घडत आहे त्यातून आपले परराष्ट्रीय धोरण चुकलेले दिसते. आजपर्यंत चीनला आपण रोखले होते. मात्र, आज ती स्थिती राहिली नसून सीमांचे रक्षण करण्यात मोदी सरकार कमी पडले, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
हेही वाचा...पुन्हा लाॅकडाऊन अशक्य आणि पाहिजे असेल तर मोदींना सांगा : भुजबळ
बाळासाहेब थोरात यांनी आज (शुक्रवार) सकाळी मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सहकाऱ्यांसह शांततेत आंदोलन केले. राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला. राज्यव्यापी आंदोलनाबरोबरच #SpeakUpForOurJawans ही ऑनलाइन मोहिमही राबिवण्यात आली. यावेळी थोरात यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, आमदार झिशान सिद्दीकी, चरणजितसिंग सप्रा, मधु चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत हे उपस्थित होते.
दुपारी गांधी भवन येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत केले. यावेळी चव्हाण यांनी चीनच्या घुसखोरीवरुन मोदी सरकारचा खरपूर समाचार घेतला. चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी ही चिंतेची बाब आहे. देशहिताचा विचार करत सरकार देशाच्या संरक्षणासाठी जो निर्णय घेईल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. परंतु, चीनने भारताच्या भूमीवर घुसखोरी केलीच नाही, हे पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य चीनला पोषक ठरले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा परिणाम झाला आहे, असे चव्हाण म्हणाले.