महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अंबानी धमकी प्रकरणी मोठी कारवाई : तिहारमधील इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्याकडून मोबाईल जप्त - दिल्ली पोलीस

स्फोटके ठेवण्याची जबाबदारी घेणारा ग्रुप तिहार तुरूंगातील एका मोबाईल नंबरवरून तयार करण्यात आल्याचे तपासातून समोर आले होते. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दिली.

अंबानी धमकी प्रकरणी मोठी कारवाई : तिहार तुरूंगातून मोबाईल जप्त
अंबानी धमकी प्रकरणी मोठी कारवाई : तिहार तुरूंगातून मोबाईल जप्त

By

Published : Mar 12, 2021, 10:10 AM IST

Updated : Mar 12, 2021, 10:49 AM IST

नवी दिल्ली :मुकेश अंबानींच्या अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओत स्फोटके आढळल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तिहार तुरुंगातील इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्याकडून एक मोबाईल जप्त केला आहे. याच मोबाईलवरून धमकीसाठीचे टेलिग्राम अकाऊंट तयार करण्यात आल्याचे समजते आहे. मोबाईल ज्या ठिकाणहून जप्त करण्यात आला, त्या ठिकाणी शिक्षा ठोठावण्यात आलेले दहशतवादी कैद आहेत. स्पेशल सेल या प्रकरणी पुढील तपास करत आहे.
इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्याकडून मोबाईल जप्त

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी तहसीन अख्तर उर्फ मोनू याच्या बराकमधून हा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. इंडियन मुजाहिदीनच्या ऑपरेशनल टीमचा तो महत्वपूर्ण भाग होता. त्यानेच जैश उल हिंदच्या नावे टेलिग्राम ग्रुप बनवून अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी स्वीकारली होती असे पोलिसांचे म्हणणे आहे. मोदींच्या गांधी मैदानमधील रॅलीतील स्फोट, हैदराबाद बॉम्बस्फोट, बोधगयेतील स्फोट अशा घटनांमध्ये त्याचा सहभाग होता.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीवरून कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजक मुकेश अंबानींच्या घरासमोर एका स्कॉर्पिओमध्ये स्फोटके आढळली होती. याची जबाबदारी जैश उल हिंद या संघटनेने घेतली होती. याचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केला जात होता. स्फोटके ठेवण्याची जबाबदारी घेणारा ग्रुप तिहार तुरूंगातील एका मोबाईल नंबरवरून तयार करण्यात आल्याचे तपासातून समोर आले होते. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला दिली.
तिहारमधून मोबाईल जप्त

स्पेशल सेलने मिळालेल्या माहितीवरून तिहारमध्ये शोधमोहिम राबविली आणि एक मोबाईल जप्त केला. काही कुख्यात दहशतवाद्यांना ठेवलेल्या बराकमधून हा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलच्या टेलिग्राम अकाऊंटवरून स्फोटके ठेवल्याची जबाबदारी घेण्यात आल्याचे स्पेशल सेलचे म्हणणे आहे. हा मोबाईल लवकरच फॉरेन्सिककडे तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. यातून आणखी महत्वाची माहिती समोर येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा -मुकेश अंबानी प्रकरणातील गाडीचा मालक मनसुख हिरेन नाहीच!

Last Updated : Mar 12, 2021, 10:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details