मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे त्यांना लागणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडूलागल्या आहेत. अनेक रुग्णांना रेमडेसिवीर हे इंजेक्शन घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. काही मेडिकल दुकानात या इंजेक्शनचा साठा करून ठेवत आहेत. दुकानांवर कारवाई करा नाहीतर आम्ही धडा शिकवू असा इशारा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला आहे.
मुंबई-विलेपार्ले पश्चिम येथील केमिस्टमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपल्बध असून फक्त ठराविक श्रीमंत ग्राहकांनाच नियोजनबद्ध पद्धतीने ते मिळत आहे. आपण कारवाई कराल ही अपेक्षा, अन्यथा अशा सर्व केमिस्टना जनहितार्थ धडा शिकवणार हे निश्चित, असे ट्विट मनसे नेते अखिल चित्रे यांनी केले आहे.
करोना वैद्यकीय उपचारात रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपयोगी पडत असले तरीही या इंजेक्शनची उपलब्धता बुधवारी मुंबईमध्ये नव्हती. खासगी रुग्णालयामधील रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले जात होते. इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे त्याची उपलब्धता होत नसल्याचे अधिकृत विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
अनेक रुग्णांचे एचआरसीटीचे अहवाल खराब आहेत, त्यांना धाप लागणे, कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे तापही येत होता. डॉक्टरांनी त्यांना रेमडेसिवीर द्यावे लागेल, असे सांगितल्यानंतर मुंबईतील अनेक रुग्णांचे नातेवाईक सातत्याने सगळीकडे विचारणा करत होते. ज्यांना हे इंजेक्शन कुठे मिळेल याची माहिती नव्हती त्या रुग्णांच्या नातेवाईकांचे चेहरे चिंतेमुळे काळवंडले होते. करोना नसलेल्या मात्र करोनासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांनाही कुटुंबीयांच्या संमतीने रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येत होते. मात्र, हा साठा कमी पडत असल्यामुळे काही विक्रेते याचा गैरफायदा घेत काळाबाजार करत आहेत अशा विक्रेत्यांना मनसेने इशारा दिला आहे.