मुंबई- मनसेने मुंबई महापालिकेला पत्र देऊन ईडी कार्यालयाचा फलक मराठीत करावा अशी मागणी केली आहे. दादरच्या कोहिनूर मिल जमीन खरेदीप्रकरणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर मनसेने आक्रमक भुमिका घेत ईडी कार्यालयाचा फलक मराठीत नसल्याने तो मराठीत करावा अशी मागणी केली आहे.
'ईडी' कार्यालयाचा फलक मराठीत करा; मनसेचे महापालिकेला पत्र - ED to change the name in marathi
दादरच्या कोहिनूर मिल जमीन खरेदी प्रकरणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर मनसेने आक्रमक भुमिका घेत 'ईडी'लाच आपल्या कार्यालयातील फलक मराठीत करावा अशा सूचना दिल्या आहेत. तसे लेखी निवेदन त्यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले असून यात हिंदीत 'प्रवर्तन निर्देशालय', तर इंग्रजीत 'Enforcement Directorate' असे लिहिले आहे. या फलकावर मराठी भाषेचा वापर करण्यात आलेला नाही. यामुळे या फलकावर मराठीत 'अंमलबजावणी संचालनालय' असा उल्लेख करावा अशी मागणी मनसेने केली आहे.
दादर येथील कोहिनुर मिलच्या खरेदी विक्रीबाबत ईडीकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांना नोटीस बजावण्यात आली. याप्रकरणी राज ठाकरे यांना २२ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आले. राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी ईडी कार्यालयाबाहेरील फलक मराठीत नसल्याचे निदर्शनास आल्याने हा फलक मराठीत लावावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. मनसेचे उपाध्यक्ष अरविंद गावडे यांनी महापालिकेच्या फोर्ट येथील 'ए' विभाग कार्यालयाला एक पत्र दिले आहे. या पत्राची प्रत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ईडी कार्यालयाही देण्यात आली आहे.
या पत्रात, 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 अंतर्गत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम 1961 च्या नियम 20 'ए' नुसार प्रत्येक आस्थापनेच्या नावाची पाटी मराठीत ठळक अक्षरात असली पाहिजे. त्यानंतर इंग्रजी किंवा इतर भाषेचा उल्लेख असणे बंधनाकारक आहे. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सुत्रानुसार महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा आहे. मराठी भाषेची काटेकोर अंमलबजावणी केली जावी म्हणून राज्य सरकारने शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार केंद्रीय कार्यालयातही मराठी भाषेचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अंमलबजावणी संचालनालयाच्या फलकावर मराठी भाषेचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबधीत कार्यालयाला तशा सुचना कराव्यात व केलेल्या कारवाईचे उत्तर लेखी स्वरूपात द्यावे असे म्हटले आहे.
काय आहे फलकावर -
मुंबईमधील फोर्ट येथे ईडीचे कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर जो फलक आहे त्यावर हिंदीमध्ये 'प्रवर्तन निर्देशालय' असे लिहले आहे. त्याखाली 'Enforcement Directorate' असे इंग्रजीत लिहिले आहे. या फलकावर मराठी भाषेचा वापर करण्यात आलेला नाही. यामुळे या फलकावर मराठीत 'अंमलबजावणी संचालनालय' असा उल्लेख करावा अशी मागणी मनसेने केली आहे.