मुंबई: भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत (Andheri by election) आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर भाजपने आपला उमेदवार देऊ नये, असे आवाहन केले होते. अखेर आज भाजपने आपले अधिकृत उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांचा अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत मनसेचे नेते व सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे आभार मानले आहेत.
भाजपने परंपरा राखली:यावेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला आणि त्या जागी जर घरातील उमेदवार असेल तर ती निवडणूक बिनविरोध केली जाते. ही परंपरा कायम ठेवण्यासंदर्भात आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आणि या पत्रानंतर आपला उमेदवार मागे घेत भाजपने परंपरा राखली."
राज ठाकरे यांनी ट्विट करून मानले आभार:भाजपने पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.