मुंबई - कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणादेखील कोलमडले चित्र काही ठिकाणी आहे. त्यातच मुंबईतील सर्वात मोठे बीकेसी जम्बो कोविड सेंटरवरती मनसेने गंभीर आरोप केले आहेत. या कोविड सेंटरमध्ये 90 टक्के डॉक्टर BDS, BAMS, BUMS, BHM आहेत. तर हे डॉक्टर गंभीर स्वरूपाच्या रुग्णावर उपचार कसा करणार, असा प्रश्न मनसे नेते अखिल चित्रे यांनी उपस्थित केला.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आम्ही नामवंत डॉक्टरांची फौज उभी करू मात्र आम्हाला प्रशासन सहकार्य करत नाही असा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.
या पत्रात मांडलेले मुद्दे
बहुतांश डॉक्टर हे तज्ज्ञ नाहीत
मुंबईसह महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वत्र वैद्यकीय क्षेत्र जोमानं काम करत आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही अनेकदा विविध व्यवस्थांशी संपर्क साधतो आणि त्यावेळेस जेव्हा इतकं दयनीय चित्र डोळ्यासमोर आलं की, धक्काच बसतो! मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कोव्हीड महाकेंद्रातील (BKCJumbo Covid Center) एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. या बीकेसी कोविड सेंटरच्या अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असून, यातील बहुतांश डॉक्टर हे तज्ज्ञ नाहीत.
एकच MBBS डॉक्टर उपलब्ध
माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार, अतिदक्षता विभागात फक्त एकच MBBS डॉक्टर उपलब्ध आहे. तसंच हृदयासंदर्भात किंवा अर्धांगवायुचा त्रास जाणवल्यास उपचार करण्यासाठी कार्डिओलॉजिस्ट आणि न्युरोलॉजिस्टही उपलब्ध नाहीत. एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्यांना पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी सांगितले जाते.
जम्बो कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आम्ही डॉक्टरांची फौज उभी करतो
मुख्यमंत्री महोदय, या सर्व भोंगळ कारभाराबद्दल आपणास अनभिज्ञ ठेवलं जातंय. अशा कुचकामी कंत्राटदाराला गोरेगाव येथील १२०० खाटा असलेले नेस्को कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय पुरवण्याचे कंत्राट महापालिकेकडून देण्यात येणं अजिबात संयुक्तिक नाही. अनेक नामवंत डॉक्टरांची फौज काम करण्यासाठी इच्छुक आहे, त्या सर्वानी आमच्याशी संपर्क साधला म्हणून आम्ही कोविड सेंटरच्या प्रशासनाशी संपर्क साधला, डॉक्टरांची कमतरता असेल तर आम्ही डॉक्टरांची फौज उभी करतो. परंतु कोविड महाकेंद्रातील कंत्राटदार व प्रशासन आम्हास सहकार्य करण्यास तयार नाही, म्हणूनच हा जाहीर पत्राचा मार्ग स्वीकारावा लागतो आहे. आमच्याकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते राहिलंच पण जनतेतून जम्बो कोविड सेंटरची विश्वासार्हता कमी होण्याआधी सरकारने आवश्यक पाऊले उचलावीत असा सल्ला चित्रे यांनी पत्रात दिला आहे.
मनसेच्या मुख्य मागण्या
बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल केल्यावर थेट १५ दिवसांनीच रुग्णांना भेटता येते, असं का? असंही जम्बो सेंटर सर्व्हिलन्सवर आहेच मग त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक रुग्णाचा सीसीटीव्ही र्व्हिलन्स लिंक थेट नातेवाईकांना पाठवा, म्हणजे नातेवाईकांना एक विश्वास निर्माण होईल.