मुंबई - वाढीव वीज बिलाविरोधात मनसेने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. मनसेच्या आजच्या आंदोलनाला मुंबई, पुणे, ठाणे येथे परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, तरीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढत महाविकास आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली. आंदोलनादरम्यान मुंबई, ठाणे, पुणेसह अनेक ठिकाणी मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज दिवसभरात राज्यात मनसेच्यावतीने केलेल्या आंदोलनाचा सविस्तर आढावा...
वीजबिल मागायला कोण आलं तर त्याच्या कानाखाली शॉक बसेल; मनसेचा इशारा
मुंबई - कोरोनाकाळातील महिन्यामध्ये वाढलेले अवाजवी वीजबिलांमध्ये माफी द्यावी यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. आज मुंबईत बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोणी वीजबिल भरू नका आणि जर वीजबिल मागायला कोण आलं तर त्याच्या कानाखाली शॉक बसेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
पुण्यात मोर्चा काढण्यासाठी जमलेल्या मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड
पुणे- महावितरणकडून आकारल्या जाणाऱ्या वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज पुण्यात आंदोलन केले जाणार होते. पुण्यातील शनिवारवाडापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही शेकडो कार्यकर्त्यांची शनिवारवाडा परिसरात एकत्र येऊन मोर्चा काढण्यासाठी तयारी सुरू होती. मात्र, यावेळी मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दोन तास चाललेल्या नाट्यमय घडामोडीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही सोडून देण्यात आले.
वाढीव वीजबिलांविरोधात मनसेचे पालघरमध्ये आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पालघर- महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली वाढीव वीजबिले माफ करण्यास नकार दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर येथे देखील मनसेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
रत्नागिरी - वाढीव वीजबिलांविरोधात आज रत्नागिरीतसुद्धा मनसेने धडक मोर्चा काढला. रत्नागिरीतील मारुती मंदिरापासून या मोर्चाला सुरवात झाली. हा मोर्चा पायी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी वाढीव वीजबिलांचे विरोध करत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
ठाण्यात मनसेचे वीजबिल आंदोलन पेटले; मनसैनिक-पोलीस आमनेसामने
ठाणे - मनसेने काढलेल्या विराट मोर्चाला पोलिसांनी ठाण्यात अडवल्याने मोठा वाद निर्माण झाला. लॉकडाऊन काळात सामान्यांना आलेल्या अधिकच्या वीजबिलांविरोधात मनसेने दंड थोपटले आहेत. आज ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एका विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो मनसैनिक आणि सामान्य ठाणेकर या मोर्चात सामील झाल्याने रस्ते मनसेच्या झेंड्यानी फुलून गेले होते. यावेळी काहीकाळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागपुरात मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी लावला ब्रेक, तर ऊर्जामंत्र्यांची केंद्रावर टीका
नागपूर - लॉकडाऊनच्या काळात आलेले वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी नागपुरात मनसेने आज मोर्चा काढला. मनसेचे विदर्भ प्रमुख हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून हा मोर्चा निघाला. मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी मोर्चा अडवून धरल्यामुळे मनसेच्या चार नेत्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन सादर केलं.
वाढीव वीज बिलाविरोधात पोलिसांचा विरोध झुगारून मनसेचे आंदोलन
औरंगाबाद -कोरोनाच्या संकटात वीजवितरण कंपनीने नागरिकांना जास्तीचे वीजबिल देत शॉक दिला. वाढीव बिल रद्द करा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यावर वीजबिल कमी करू असे संकेत राज्यातील मंत्र्यांनी दिले होते. मात्र नंतर त्याच मंत्र्यांनी वीजबिल भरावे लागेल असे सांगितले. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत वीजवितरण विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. त्यानुसार राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मनसेने आक्रमक होत पोलिसांचा विरोध झुगारून सरकारविरोधी घोषणाबाजी केली.ं
सोलापुरात वीजबिल माफीसाठी मनसेचा विराट मोर्चा; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा