महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वे भरती प्रक्रियेवरून मनसेची मध्य रेल्वे मुख्यालयावर धडक; सात दिवसांचा दिला अल्टिमेटम - मुंबई रेल्वे भरती प्रकरण

मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने मध्य रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयात धडक दिली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कसंल यांच्याशी आज (गुरूवारी) चर्चा करून प्रतीक्षा यादीत असलेल्या ३९८ मराठी उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे.

मनसे आंदोलन
मनसे आंदोलन

By

Published : Jul 8, 2021, 5:48 PM IST

मुंबई -रेल्वे भरती महामंडळाच्या मुंबई विभागातून २०१८ रोजी असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशीयन पदासाठी ५ हजार ७५४ पदासाठी नोकर भरती घेण्यात आली होती. मात्र सर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या ३९८ मराठी उमेदवारांना डावलून रेल्वे भरती बोर्डाने रेल्वेकडून गोरखपूर आणि बिलासपूरच्या उमेदवारांना नोकरी दिली. त्यामुळे रेल्वे भरतीतमध्ये महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांवर अन्याय झालेला आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. याविद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आज मध्य रेल्वे मुख्यालयात आलो आहोत, असेही ते म्हणाले.

रेल्वेकडून परप्रांतीयांना नोकरी-

रेल्वे भरती बोर्डाने २०१८ मध्ये असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशीयनच्या ६४ हजार ३७१ पदाच्या जागेसाठी नोकर भरती काढण्यात आली होती. यात मुंबई आरआरबीमध्ये असिस्टंट लोको पायलटसाठी १ हजार ८६६ आणि टेक्निशीयनसाठी ३ हजार ८८८ अशा एकूण ५ हजार ७५४ पदासाठी नोकर भरती झाली होती. विशेष म्हणजे, असिस्टंट लोको पायलटच्या पदासाठी आरआरबीने तीन परीक्षा घेतल्या व त्यानंतर या जागांसाठी १.५ पट उमेदवारांचे कागपत्र पळताळणी आणि आरोग्य चाचणी करण्यात आले. त्यामधून त्यांनी १ हजार ८६६ विद्यार्थ्यांचा पॅनल दिला व उरलेल्या 398 विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीतमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु या भरती प्रक्रियेमध्ये आरआरबी मुंबईमध्ये येणाऱ्या पश्चिम रेल्वेने १ हजार ८६६ जागा व्यतिरिक्त नवीन १ हजार २३९ जागा बोर्डकडे पाठवल्या व या जागांवरती गोरखपूरचे ४७९ विद्यार्थी हजर करून घेण्यात आले. गोरखपूरचे या ४७९ विद्यार्थींना घेतल्यानंतरही पश्चिम रेल्वेमध्ये ७६० जागा रिक्त आहेत. तसेच बिलासपूरवरून ५० विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये बोलवून घेतले आणि आता राहिलेल्या जागावरती भुवनेश्वरचे विद्यार्थी घेण्याचा बेत आखत आहेत. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी गुण आहेत, परंतु तरीही आम्हाला प्राधान्य न देता बाहेरील मुलांना बोलावण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भूमिपुत्रावर अन्याय होत असल्याचा आरोप मराठी उमेदवारांनी केला आहे.

राज ठाकरेंकडे उमेदवारांनी घेतली धाव-

रेल्वेमध्ये भर्ती प्रक्रियेसाठी २१ आरआरबी बोर्ड असून आरआरबी मुंबई हे एक आहे. नियमानुसार ज्या विद्यार्थ्यांनी ज्या बोर्डमधून अर्ज केला आहे. त्यांना तेथेच काम करावे लागते. परंतु या सर्व नियमांचे पालन न करता महाराष्ट्रातील ३९८ मेडिकल फिट विद्यार्थ्यांना इतरापेक्षा जास्त गुण असून देखील 2 वर्षांपासून प्रतीक्षा सूचीमध्ये ठेवले आहे. याशिवाय आरआरबी मुंबईमधून टेक्निशीयन पदासाठी ३ हजार ८८८ पद भरती केली आहे. मात्र, यातून अनेक उमेदवारांनी काही कारणास्तव जॉईन केले नाही. त्यामुळे टेक्निशीयन पदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नोकरी सामावून घ्यावेत. याबाबद अनेकदा आम्ही रेल्वेकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, आतापर्यत आमची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून महाराष्ट्रातील रेल्वेत ८५ टक्के जागाही इथल्या भूमिपुत्रासाठी आरक्षित आहे. मात्र महाराष्ट्राच्या रेल्वेत पूर्वीपासून मराठी कर्मचाऱ्याचा टक्का खूप कमी असल्याचे या उमेदवारांनी सांगितले.

सात दिवसांचा दिला अल्टिमेटम-

रेल्वे नोकर भरतीमध्ये स्थानिक मराठी उमेदवारांना डावलण्यात आले आहे. या उमेदवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने मध्य रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयात धडक दिली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कसंल यांच्याशी आज (गुरूवारी) चर्चा करून प्रतीक्षा यादीत असलेल्या ३९८ मराठी उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी केली आहे. तसेच सात दिवसांचा दिला अल्टिमेटमही रेल्वेला दिलेला आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी सांगितले, की मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कसंल यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. यावर तत्काळ तोडगा काढण्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापक प्रयत्न करणार असल्याचे आम्हाला आश्वसन दिले आहे.

हेही वाचा-मुंडे भगिनी नाराज नाहीत, उगाच त्यांना बदनाम करू नका - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details