मुंबई - गुढीपाडव्याच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेचा पाडवा मेळावा पार पडला. या पाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांचे भाषण त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चांगलेच चर्चेत आले. त्यांच्या बदललेल्या भूमिकेवर अद्याप देखील क्रिया प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या भोंग्यांच्या भूमिकेवरून तर मनसेतच दोन गट पडले आहेत. मनसेच्या काही मुस्लीम नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देखील राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. पक्षावर अशी वेळ आल्यानंतर आता राज ठाकरे यांनी या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी पुन्हा एकदा 9 तारखेला ठाण्यात 'उत्तर सभे'चे आयोजन ( Raj Thackeray to hold Uttar Sabha in Thane ) केले आहे.
उत्तर सभा कशासाठी ? यासंदर्भात माहिती देताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे व ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की, "आपल्याकडे पूजेनंतर उत्तर पूजेची प्रथा आहे. काही जणांना राज साहेबांची भूमिका चांगलीच झोंबली, अशा लोकांसाठीच त्यांना उत्तर द्यायला उत्तर पूजेप्रमाणे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकांना स्वतः राज ठाकरेच सभेच्या माध्यमातून उत्तर देतील."