मुंबई :गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांनी देखील आपण हिंदुत्वासाठी हे बंडखोरी केल्याचं म्हटलेलं आहे. आता राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत काही राज्यातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याची मागणी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडे केली होती. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अवैध मदरसे सुरू असल्याचा आरोप मनसेने केला होता. त्यामुळे या अनधिकृत मदरशांबाबत काय आहे मनसेचा प्लॅन? या मदरशांविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार का? याचा ईटीव्हीने आढावा घेतलेला (Raj Thackeray against unauthorized Madrasa) आहे.
मदरशांमध्ये देशविघातक कारवाया ?यासंदर्भात माहिती देताना मनसेचे प्रवक्ते योगेश चिले म्हणाले की, आपल्या राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत मदरसे सुरू असून, हिंदू बहुल भागातील इमारतींमध्ये अशा अनधिकृत मदरशांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे अनधिकृत मदरसे सुरू असलेल्या हिंदू रहिवासी भागाला मुस्लिम भाग बनवण्याचं हे एक मोठं षडयंत्र आहे. आपला महाराष्ट्र वगळता देशात अनेक ठिकाणी अशा अनधिकृत मदरशांचे सर्वेक्षण झालं असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम या राज्यांनी अनधिकृत मदरशांचे सर्वेक्षण केलं असून काही मदरशांवर तात्काळ कारवाई देखील केली आहे. इथे त्यांना देशविघातक कृत्य दहशतवादी कारवाया कट रचले जात असल्याचं तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलं आहे.