मुंबई - रुग्णाचा कोविड रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असेल तर तो त्याला न कळवता थेट महानगरपालिकेला कळवण्याचा आदेश आज आयुक्तांनी जारी केला. आयुक्तांच्या या आदेशावर मनसेने शंका उपस्थित करत हा आदेश म्हणजे रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा प्रकार असल्याची टीका मनसे नेते नितीन नांदगावकर यांनी केली आहे.
मनसे नेते नितीन नांदगावकर कोविड चाचणीनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तो रिपोर्ट आता रुग्णाला मिळणार नाही. तो थेट पालिकेकडे जमा होणार आहे. तसे आदेशच पालिका आयुक्तांनी काढले आहेत. स्वतःचा रिपोर्ट मिळणे हा रुग्णाचा अधिकार कसा काय हिरावून घेऊ शकता, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.
महानगरपालिकेची एकूणच कामाची पद्धत पाहता, त्या पॉझिटिव्ह रुग्णाला उपचार मिळण्यास दिरंगाई झाली आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित करत रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न नितीन नांदगावकर यांनी विचारला आहे.
यापूर्वी रिपोर्ट पॉझिटिव्ह असो अथवा निगेटिव्ह, तो रुग्णाला सांगितला जात होता. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला योग्य खबरदारी घेता येत होती. आता मात्र पॉझिटिव्ह रिपोर्टची माहिती मिळणार नसल्याने यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढणार आहे, याला सर्वस्वी पालिका जबाबदार असेल, असे नांदगावकर यांनी सांगितले.