मुंबई -मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त लसीकरण हाच मार्ग सध्या दिसत आहे. सध्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांनी देखील लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. तसेच जेष्ठ नागरिकांनी केंद्रात मोठी रांग लावून सुद्धा लस मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
यामुळे जास्तीत जास्त लसीकरण केंद्र नागरिकांच्या घराजवळ उभी करावी जेणेकरून गर्दी होणार नाही, अशी मागणी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
लसीकरण मोहीम मुंबईत पूर्णतः थंडावली
३० एप्रिल २०२१ रोजी लाईव्ह येऊन मुंबईसह राज्यात १ मे पासून वयवर्ष १८ पुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. परंतु राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी १५ मे पर्यंत १८ पुढील व्यक्तींसाठीचा लस साठा नाही, असे सांगितले होते आणि ते आत्ता खरे ठरतं आहे. परिणामी लसींचा साठा नसल्याने मुंबईकर लस घेण्यापासून वंचित राहत आहेत.
१८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी मुंबईत केवळ नायर रुग्णालय, बी.के.सी. कोव्हिड सेंटर, सेवनहिल्स रुग्णालय, कूपर रुग्णालय व राजावाडी रुग्णालय अशा पाचच केंद्रावर लसीकरण सुरू असून इतर खासगी व सरकारी केंद्रे बंद आहेत. त्याचे कारण मुंबई पालिकेस मिळणारा लसींच्या साठा जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मुंबईत पूर्णता थंडावली आहे. त्यातच पहिली मात्रा घेतल्यानंतर एका विशिष्ट कालावधीत दुसरी मात्रा घेणे अपेक्षित आहे. परंतु अतिशय कमी साठा व मोजकीच केंद्रे खुली असल्याने दुसरी मात्रा देण्याची वेळ आलेल्या ची फरफंट सुरू असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.
तर 1 मे पासून लसीकरणाची घोषणा का केली ?
या लसीकरण मोहिमेत ४५ वर्षाच्या पुढील वयोगटातील अनेक लोकांची पहिली मात्रा ही घेणे बाकी आहे, तसेच पहिली आणि दुसरी मात्रा घेण्याकरिता ऑनलाइन वेळापत्रकात कुठल्याही स्लॉट उपलब्ध नाही. जर साठाच नाही तर मग १ मे पासूनची घोषणा करण्याची घाई का केली? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. लसीची दुसरी मात्रा कधी मिळणार, त्यासाठी अपेक्षित मुदत चुकल्यास पर्याय काय, सदर डोस चुकल्यास प्रतिकारशक्ती कमी तर होणार नाही ना, दुसरी मात्र कधी मिळणार हे कळले तर बरे होईल अशां अनेक प्रश्नांनी मुंबईकरांना भेडसावले आहे. त्याच प्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी पाच केंद्र असल्याने फारच मर्यादा आल्या आहेत. लांबून लांबून येणारे लोक एवढ्या उन्हात कसे काय लसीकरणांसाठी येणार हाही प्रश्नच उपस्थित होत आहे.
केंद्रे वाढवायला हवीत.
लसीकरण घराजवळ मिळायला हवं त्यासाठी केंद्रे वाढवायला हवीत. म्हणजे गर्दीही होणार नाही आणि लोकांना घराजवळ लसीकरण सुलभ होईल. आपण या सर्व बाबींचा संवेदनशीलपणे विचार करून मार्ग काढावा आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी किल्लेदार यांनी केली आहे.