मुंबई - औरंगाबादचे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला ( MNS Leader Suhas Dasharathe Joined BJP). विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांनी हा प्रवेश केला. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, आमदार अतुल सावे व अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. भाजपमध्ये प्रवेश करताना मनसेत असताना नेमकी माझी काय चूक झाली व मला पदावरून का हटवण्यात आले हे मला अद्याप समजले नसल्याचे, सुहास दशरथे यांनी सांगितले.
मनसेसाठी मोठा झटका -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या सभेला अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तसेच, जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातच आता मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी आज मनसेचे इंजिन सोडून भाजपची वाट धरली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर या शासकीय निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला.