मुंबई : पत्राचा गैरव्यवहार प्रकरणातील आरोपाप्रकरणी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader and MP Sanjay Raut ) सध्या ईडी ( ED custody ) कोठडीत आहेत. संजय राऊत ईडीच्या अटकेत असले तरी ते कार्यकारी संपादक असलेल्या सामनात अग्रलेख सातत्याने लिहीत आहेत. आज रविवारचे त्यांचे विशेष रोखठोक सदरदेखील त्यांच्या नावाने प्रसिद्ध ( Samana NewsPaper ) झाले आहे. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला असून, संजय राऊत यांना अटक झालेली असताना त्यांना अग्रलेख लिहिण्याची परवानगी कशी दिली जाते? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व नेते संदीप देशपांडे यांनी ( MNS leader Sandeep Deshpande Criticised ) उपस्थित केला आहे.
तुम्ही काही स्वातंत्र्य सेनानी नाही :यावेळी माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. या पत्राचाळ भ्रष्टाचारामुळे जवळपास 650 हून अधिक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अशा प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला असे लेख लिहिण्याची परवानगी आहे का? कारण जसं लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तुरुंगात बसून अग्रलेख लिहिले ते प्रसिद्ध झाले आणि चळवळी उभ्या राहिल्या. त्याप्रमाणे तुमचं काही नाही. तुम्ही काही स्वातंत्र्यसेनानी नाही. तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत आहात. त्यामुळे आमचा प्रश्न आहे अशा आरोपांखाली अटक असणाऱ्या व्यक्तीला अग्रलेख लिहिण्याची परवानगी दिली आहे का?" अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.