मुंबई - शिवसेनेपासून दुरावलेला भाजप आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नव्या भिडूच्या शोधात आहे. यामुळे भाजप आणि मनसे पालिका निवडणुकीत एकत्र येतील अशी चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र, मनसेने अजूनही आपले पत्ते उघडले नसले तरी भाजपसोबत मराठी अस्मिता आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, असे संकेत मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिले आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दुखावलेल्या भाजपने आता मुंबई महानगरपालिकेकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आपले राजकारण यावर आधारीत असणार आहे, असे सांगितले आहे. यामुळे भाजप आणि मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.