मुंबई- मुंबईतील आयईएस न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रशासनाने शुल्क न भरल्याने जवळपास ४०० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. त्यामुळे त्यामुळे पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांच्याकडे धाव घेतली. पालकांच्या तक्रारीची दखल घेत चित्रे यांनी शाळेत ठिय्या आंदोलन केले. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय प्रशासनाचा असल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. त्यानुसार आता मनसेकडून ४८ तासांची मुदत देत विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात प्रवेश न दिल्यास शुक्रवारी शाळेबाहेर विद्यार्थी व पालकांना घेऊन भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
४०० विद्यार्थ्यांचे शैक्षाणिक नुकसान होणार -
कोरोनाच्या परिस्थितीचा समाजातील प्रत्येक घटकावर वाईट परिणाम झाला आहे. बहुतेक नागरिकांनी यासाथीच्या रोगाशी चालू असलेल्या लढाई दरम्यान आपले प्राण किंवा नोकऱ्या गमावल्या आहेत. मुंबईतही कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून रोजगार नसल्याने किंवा उपचारात प्रचंड पैसा खर्च झाल्याने बहुतेक लोकांच्या घरात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. अशातच १५ जूनपासून सर्वत्र ऑनलाईन शाळा सुरू झाल्या. मात्र त्यापूर्वी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना चालू शैक्षणिक वर्षाचे पूर्ण शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेकांनी शुल्क भरणे शक्य होत नसल्याने पालकांकडून सवलत मागण्यात येत होती. मात्र अनेक शिक्षणसंस्थांनी याकडे दुर्लक्ष करत पालकांना शुल्क भरण्यास भाग पाडले. वांद्रेमधील आयईएस न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रशासनाने शुल्क न भरल्याने जवळपास ४०० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अकाऊंट ब्लॉक केले. त्यामुळे ४०० विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.