मुंबई -गेली काही वर्षे राजकीय यशासाठी धडपडणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. गाव पातळीवर आपला पक्ष पोहोचावा, यासाठी मनसेने कंबर कसली असल्याचे या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मनसेनेदेखील पुढील रणनिती आखण्यासाठी आज बैठक बोलावली आहे.
मनसेचे मुख्य कार्यालय असलेल्या राजगड येथे आज 5 वाजता बैठक होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 70 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांची आज तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व सिंधुदुर्गवासीय महिला व पुरुष पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांना बोलवण्यात आले आहे.
हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा मनसेचा निर्णय
ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यामुळे मरगळ आलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक लढवणार अशी घोषणा केली होती. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष वेगाने तयारीला लागले आहेत.