मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिका, महापौर आणि कोविड काळात महापालिकेच्या आर्थिक कारभारावर जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेत मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे सुद्धा उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यापासून मुंबईच्या महापौरांपर्यंत महापालिका कारभारा बद्दल आरोप केले आहेत. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात राजकारण करू नका, सहकार्य करा', पण पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचर होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बीकेसी सेंटरमध्ये बनवण्यात आलेल्या क्वावेंटाइन सेंटरचे कंत्राट 'इव्हेंट कंपनी'ला दिल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्यांना वैद्यकीय कामाचा अनुभव नाही, ई-टेंडरमध्ये त्यांची पडताळणी नाही, अशा 'किश कॉर्पोरेट सर्व्हिस इंडिया' कंपनीला या सेंटरच कंत्राट मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच सदर कंपनीमध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांचे पुत्र साईप्रसाद पेडणेकर संचालक असून त्यांच्यासह शैला वसंत गवस आणि प्रशांत महेश गवस हे या कंपनीचे संचालक असल्याचे त्यांनी सांगितले.