मुंबई -आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून वांद्रे-कुर्ला संकुला(बीकेसी)चा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून 2011मध्ये बीकेसीत 6 कोटी रुपये खर्च करत सायकल ट्रॅक तयार करण्यात आला. पण या सायकल ट्रॅकचा वापर एक दिवसही झाला नाही. हा प्रकल्प पूर्णतः 'फ्लॉप' ठरला. यावरून एमएमआरडीएवर मोठी टीका झाली आणि त्यानंतर एमएमआरडीएने या प्रकल्पाचा नाद सोडला. पण आता पुन्हा एकदा एमएमआरडीएने सायकल ट्रॅकचा घाट घातला आहे. त्यामुळे आता एमएमआरडीएच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
2011मध्ये बांधला होता सायकल ट्रॅक
बीकेसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना एमएमआरडीएकडून सातत्याने पुढे आणल्या जातात. त्यानुसार बीकेसीअंतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी इको फ्रेंडली पर्याय म्हणून सायकल ट्रॅकची संकल्पना एमएमआरडीएने पुढे आणली. त्यानुसार 6 कोटी रुपये खर्च करत बीकेसीत सायकल ट्रॅक उभारण्यात आला. पदपथाच्या बाजूने हा सायकल ट्रॅक तयार करत यावरून केवळ सायकललाच प्रवेश होता. हा सायकल ट्रॅकचा चांगला उपयोग होईल असा दावा त्यावेळी एमएमआरडीएने केला होता.
एक दिवसही सायकल ट्रॅकचा वापर नाही
2011मध्ये 6 कोटी खर्च करत बांधण्यात आलेल्या या सायकल ट्रॅकचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या सायकल ट्रॅकवरून सायकल चालवत उद्घाटन केले होते. पण हे उद्घाटन झाल्यानंतर यावरून एक दिवसही सायकल चालली नाही. म्हणजेच या ट्रॅकचा वापर कुणीच एक दिवसही केला नाही. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी तर या सायकल ट्रॅकचा वापर चक्क पार्किंग म्हणून करत तिथे दुचाकी लावल्या. पुढे ही एक दिवसही या ट्रॅकचा वापर झाला नाही. त्यामुळे एमएमआरडीएवर मोठी टीका झाली. 6 कोटी पाण्यात घातल्याचा आरोप झाला. नंतर तर हा सायकल ट्रॅक उखडण्यात आला आणि मग खऱ्या अर्थाने 6 कोटी पाण्यात गेले. एक दिवस ही उपयोगात न आलेला असा हा प्रकल्प ठरला.
आता पुन्हा या प्रकल्पाचा घाट
बीकेसीत मल्टिनॅशनल कंपन्या, बँका मोठ्या संख्येने असून चारचाकी, दुचाकी, रिक्षा, बेस्ट बसचा अधिक वापर होतो. त्यामुळे सायकलचा उपयोग येथे केला जात नाही. असे असताना 6 कोटी खर्च करत 10 वर्षांपूर्वी सायकल ट्रॅक बांधण्यात आला होता. तर हा प्रकल्प 'फेल' गेला होता. असे असताना आता पुन्हा एमएमआरडीएने सायकल ट्रॅकचा घाट घातला आहे. बीकेसीच्या अंतर्गत सुविधा विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने 32 कोटीची योजना हाती घेतली आहे. त्या अंतर्गत बीकेसीत अंदाजे 5 किमीचा सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. पण आधी हा प्रकल्प फेल झाला असताना पुन्हा घाट का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.
'प्रकल्प रद्द करावा'
10 वर्षांपूर्वी 6 कोटी विनाकारण वाया गेल्याने यावर आक्षेप घेत गलगली यांनी हा 6 कोटीचा खर्च संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करण्याची मागणी उचलून धरली होती. या मागणीनंतर एमएमआरडीएने सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द केला. पण आता सरकार बदलले आणि पुन्हा सायकल ट्रॅकचा घाट घालण्यात आला आहे. सरकार बदलल्यास कशी धोरण बदलतात, कोणताही अभ्यास न करता, नियोजन न करता कसे प्रकल्प राबवले जातात, फेल गेलेले प्रकल्प पुन्हा कसे सुरू केले जातात याचे उदाहरण म्हणजे सायकल ट्रॅक प्रकल्प असे म्हणत गलगली यांनी यावर टीका केली आहे. बीकेसीत कुणीही सायकल चालवत नाही. तेव्हा पुन्हा पैशाची उधळण का असे म्हणत त्यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.